(म्‍हणे) ‘सनातन धर्म नष्‍ट केला, तर अस्‍पृश्‍यता आपोआप नष्‍ट होईल !

उदयनिधी स्‍टॅलिन यांची पुन्‍हा गरळओक !

चेन्‍नई (तमिळनाडू) – जातींमुळे होणारे भेदभाव संपवण्‍यासाठीच सनातन धर्म नष्‍ट केला पाहिजे. जर सनातन नष्‍ट झाले, तर अस्‍पृश्‍यताही नष्‍ट होईल, असे पुन्‍हा एकदा सनातन धर्मविरोधी विधान राज्‍याचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी यांनी केले. ते राज्‍यपाल आर्.एन्. रवि यांच्‍या विधानावर प्रत्‍युत्तर देतांना बोलत होते. राज्‍यपाल रवि यांनी एका कार्यक्रमात म्‍हटले होते की, दुर्दैवाने आपल्‍या समाजात काही भेदभाव आहेत. एका मोठ्या समाजाला समानतेच्‍या दृष्‍टीने पाहिले जात नाही. असे करण्‍यास हिंदु धर्मात कुठेही सांगण्‍यात आलेले नाही. ही एक प्रकारची सामाजिक अयोग्‍य गोष्‍ट असून ती नष्‍ट झाली पाहिजे. (राज्‍यपाल रवि यांनी काय चुकीचे सांगितले ? त्‍यांनी विकृती नष्‍ट करण्‍यास सांगितले, सनातन धर्म नाही ! – संपादक)

तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांनी ‘ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोशल जस्‍टिस’च्‍या कार्यक्रमात म्‍हटले की, आम्‍ही सामाजिक न्‍यायासाठी सातत्‍याने लढत आहोत. (सामाजिक न्‍यायाच्‍या नावाखाली सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याचे कार्य द्रमुक करत आहे, हे जगाला दिसत आहे ! – संपादक) मात्र भाजप यात अडचणी निर्माण करत आहे. गरीब आणि मागासवर्गीय यांची स्‍थिती सुधारावी, अशी भाजपची इच्‍छा नाही.

संपादकीय भूमिका

अस्‍पृश्‍यता हा सनातन धर्माचा भाग नाही. सनातन धर्मामध्‍ये कुठेही याविषयी सांगितलेले नाही. अस्‍पृश्‍यता ही काळाच्‍या ओघात समाजात निर्माण झालेली विकृती असून सनातन धर्मातील संतांनी त्‍यास विरोध करून ती संपवण्‍याचा प्रयत्न केला आहे; मात्र अस्‍पृश्‍यतेच्‍या नावाखाली द्रमुकसारखे नास्‍तिकतावादी विचारसरणीच्‍या पक्षाचे लोक सनातन धर्म नष्‍ट करण्‍याची आसुरी इच्‍छा बाळगत आहेत, हे लक्षात घ्‍या !