देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. वर्षा विनोद अग्‍निहोत्री यांच्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी त्‍यांच्‍या मुलीने अनुभवलेली गुरुकृपा !

१. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यामुळे मुतखड्याचे शस्‍त्रकर्म व्‍यवस्‍थित होणे

कु. मानसी अग्‍निहोत्री

‘२७.६.२०२३ या दिवशी माझ्‍या आईचे (सौ. वर्षा विनोद अग्‍निहोत्री, देवद आश्रम)  मुतखड्याचे शस्‍त्रकर्म होते. तेव्‍हा सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारून घेऊन ते केले. त्‍यामुळे शस्‍त्रकर्म व्‍यवस्‍थित झाले. तेव्‍हा देवाची पुष्‍कळ कृपा अनुभवायला मिळाली.

२. रुग्‍णालयात असतांना देवाला प्रार्थना केल्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी साधिकेच्‍या आईला आवश्‍यक असेल, तेव्‍हा साधिकेला जाग येणे

आईचे शस्‍त्रकर्म झाल्‍यावर तिला २ – ३ दिवस रुग्‍णालयात ठेवावे लागले. तिच्‍या साहाय्‍यासाठी मी रुग्‍णालयात थांबले होते. मला रात्री सहसा जाग येत नाही. त्‍यामुळे मी देवाला प्रार्थना केली, ‘ज्‍या वेळी आईला आवश्‍यकता असेल, तेव्‍हा तूच मला उठव.’ रात्री आई जेव्‍हा उठायची, तेव्‍हा मलाही आपोआप जाग यायची. त्‍यामुळे मी आईला साहाय्‍य करू शकले.

३. गुरुमाऊलींच्‍या कृपेने चांगले रुग्‍णालय आणि आधुनिक वैद्य मिळणे

सौ. वर्षा अग्‍निहोत्री

आईला भरती केलेले रुग्‍णालय स्‍वच्‍छ आणि व्‍यवस्‍थित होते. तेथील परिचारिका आणि आधुनिक वैद्य यांनी आम्‍हाला साहाय्‍य केले. तेथील शस्‍त्रकर्म करणार्‍या वैद्यांना ‘आम्‍ही सनातनचे साधक असून साधना करत आहोत’, हे कळल्‍यावर त्‍यांनी आम्‍हाला शस्‍त्रकर्माच्‍या शुल्‍कामध्‍ये सवलत दिली. हे केवळ गुरुमाऊलींच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने शक्‍य झाले.

४. गुरुमाऊली आणि वरूण देवता यांना प्रार्थना केल्‍यामुळे चिकित्‍सालयात जाण्‍या-येण्‍याच्‍या वेळी पाऊस थांबणे

आईचे शस्‍त्रकर्म झाल्‍यावर तिला घरी आणले. त्‍यानंतर आईला इंजेक्‍शन देण्‍यासाठी प्रतिदिन ३ वेळा असे ५ दिवस चिकित्‍सालयात घेऊन जावे लागले. तेव्‍हा पुष्‍कळ पाऊस पडत होता. आम्‍ही घराबाहेर जाण्‍यापूर्वी गुरुमाऊली आणि वरुणदेवता यांना प्रार्थना केल्‍या. तेव्‍हा आम्‍ही चिकित्‍सालयात जातांना आणि घरी परत येतांना पावसाची सर अत्‍यल्‍प असायची. त्‍यामुळे आम्‍ही प्रतिदिन घरी सुखरूप पोचू शकलो.

‘प्रारब्‍धाचे भोग कितीही कठीण असले, तरी आपल्‍यावर असलेल्‍या गुरुकृपेने ते सुसह्य होते. त्‍या वेळी जर आपण देवाला हाक मारली, तर तो भक्‍ताच्‍या हाकेला नक्‍की धावून येतो. आपण ते प्रारब्‍ध भोगण्‍यास सक्षम होतो आणि आपल्‍याला पदोपदी गुरूंची कृपा अनुभवायला येते’, याची मला तीव्र जाणीव झाली. देवाच्‍या कृपेमुळे वरील अनुभूती आली, त्‍याबद्दल देवाच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– कु. मानसी विनोद अग्‍निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी फोंडा, गोवा. (२७.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक