सातारा येथील बाँबे रेस्‍टॉरंट चौक ते संगमनगरपर्यंत नवीन पथदिवे होणार कार्यान्‍वित !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १९ सप्‍टेंबर (वार्ता.) – सातारा-सोलापूर मार्गावरील बाँबे रेस्‍टॉरंट चौक ते संगमनगरपर्यंत रस्‍ता दुभाजकामध्‍ये पथदीप बसवले आहेत. हे पथदीप लवकरच कार्यान्‍वित होणार आहेत. या मार्गाच्‍या रस्‍ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. यातील सातारा शहर भागातील बाँबे रेस्‍टॉरंट चौक ते संगमनगर या रस्‍त्‍यावरील काम पूर्ण झाले आहे; मात्र येथे पथदीप नसल्‍यामुळे स्‍थानिक नागरिकांना अनेक समस्‍यांना तोंड द्यावे लागत होते. सर्व अडचणी लक्षात घेऊन रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला प्रकाश पडेल, अशा प्रकारे २१ पथदीप रस्‍ता दुभाजकाच्‍या मध्‍यभागी बसवले आहेत. आता लवकरच ते कार्यान्‍वितही होतील.

या भागामध्‍ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी, मंडईसाठी येणार्‍या महिला यांना अंधारामुळे भटक्‍या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत होता, तसेच अंधाराचा आपलाभ घेत काही सडकसख्‍याहरी माता-भगिनींची छेड काढत असत. एकट्या व्‍यक्‍तीला पाहून २ ते ४ जणांचे टोळके त्‍याला लुटण्‍याचे प्रकार अनेक वेळा या रस्‍त्‍यावर घडले आहेत. पथदीप लावल्‍यामुळे शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला आणि ज्‍येष्‍ठ नागरिक यांच्‍या वतीने समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.