पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवरील सैन्य तळांजवळ जमवले आतंकवादी !

अनंतनागमधील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून आक्रमण होण्याची पाकला भीती !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथील कोकेरनाग भागात गेल्या ६ दिवसांपासून सुरक्षादलांची जिहादी आतंकवाद्यांशी चकमक चालू आहे. अद्यापही येथील डोंगरात २ आतंकवादी लपलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील सैन्याच्या तळांजवळ मोठ्या संख्येने आतंकवाद्यांना एकत्र केले आहे. हे आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. भारतीय सैन्याने पाक सीमेत घुसून आतंकवाद्यांवर थेट कारवाई करू नये, यासाठी त्यांना सैन्य तळांजवळ ठेवण्यात आले आहे.

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाचे ४ आतंकवादी के.जी. सेक्टर येथून घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत, तर पुंछ सेक्टरमध्ये ५ आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत आहेत. कोटली येथे ३ आतंकवादी आणि किरवाली धोक या भागांत ४, पाकव्याप्त काश्मीरमधील अन्नावाली धोक येथे ३ आणि सब्जी पोस्ट येथे ४, तर जम्मूच्या सुंदरबनी येथील सीमेवर ३ आतंकवादी घुसखोरीसाठी सिद्ध आहेत.

संपादकीय भूमिका 

काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे. भारत जोपर्यंत पाकवर धडक कारवाई करत नाही, तोपर्यंत हे वर्षानुवर्षे चालूच राहील, अशीच स्थिती आहे !