गणेशोत्‍सवानिमित्त खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’द्वारे होणारी प्रवाशांची लूटमार थांबवावी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने साहाय्‍यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन !

साहाय्‍यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (मध्‍यभागी) अमर देसाई आणि श्री. युवराज पाटील यांना निवेदन देतांना डावीकडे श्री. महेश पाठक, श्री. कृष्‍णाजी पाटील (उजवीकडून पाहिले) आणि श्री. मनोहरलाल उणेचा

पुणे – गणेशोत्‍सवानिमित्त लाखो गणेशभक्‍त स्‍वत:च्‍या गावी जाण्‍यासाठी निघत आहेत. याची संधी साधत ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’ आणि अन्‍य खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ यांच्‍याद्वारे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्‍त तथा प्रवाशांची लूटमार चालू आहे. एस्.टी. बसेसच्‍या तुलनेत दीडपट अधिक प्रवासी भाडे आकारण्‍याचा शासन आदेश असतांना खासगी प्रवासी बसचालक प्रवाशांकडून दुप्‍पट, तिप्‍पट आणि कधी चौप्‍पट दर आकारणी केली जात आहे. ८० ते ९० टक्‍के वाहनांचे आरक्षण हे खासगी प्रवासी तिकीट ‘बुकिंग अ‍ॅप’द्वारे ऑनलाईन होते; त्‍याकडे राज्‍य परिवहन विभागाचे लक्षच नाही. तरी गणेशभक्‍तांवर आलेले ऑनलाईन लूटमारीचे विघ्‍न दूर करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्‍यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘सुराज्‍य अभियाना’च्‍या वतीने करण्‍यात आली, तसेच या मागणीचे निवेदन पुणे येथे साहाय्‍यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अमर देसाई आणि श्री. युवराज पाटील यांना देण्‍यात आले आहे. त्‍यांनी याविषयी पूर्वी प्रसिद्धीपत्रक काढले असून आता लगेच अध्‍यादेश काढणार आहेत.

या वेळी समितीच्‍या वतीने श्री. महेश पाठक, श्री. कृष्‍णाजी पाटील आणि श्री. मनोहरलाल उणेचा उपस्‍थित होते.