१. कर्करोगाच्या पेशींमुळे मांडीचे हाड पोखरले गेल्याने मांडीचे शस्त्रकर्म होणे आणि आधुनिक वैद्यांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी ‘रेडिएशन’ अन् ‘इंजेक्शन्स’ घेण्यास सांगणे
‘वर्ष २०१२ मध्ये मला स्तनाचा कर्करोग झाला होता. त्या वेळी सर्व वैद्यकीय उपचार करून मी त्यातून पूर्णपणे बरी झाले. वर्ष २०२१ मध्ये माझा उजवा पाय दुखू लागला. त्यावर सर्व वैद्यकीय उपचार, ‘फिजिओथेरपी’ आणि व्यायाम केले; पण पायाला आराम मिळाला नाही. शेवटी आधुनिक वैद्यांच्या सांगण्यानुसार हाडांची तपासणी (बोन स्कॅनिंग) केली. त्यामध्ये ‘माझ्या मांडीचे हाड झिजले आहे’, असेे लक्षात आले. त्यानंतर विविध प्रकारच्या चाचण्या केल्यावर ‘१० वर्षांपूर्वी झालेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींनी हाड पोखरले आहे’, असे लक्षात आले. आधुनिक वैद्यांनी माझ्या मांडीच्या भागाचे शस्त्रकर्म करून तेथे ‘रॉड’ टाकला. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी मला कर्करोगाच्या तज्ञांकडे पाठवले. त्यांनी सर्व अहवाल पाहून मला ‘रेडिएशन’ (कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धत) घेण्यास सांगून कर्करोगाची औषधे चालू केली. ‘रेडिएशन’ झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी मला तपासण्यासाठी पुन्हा बोलावले आणि सांगितले, ‘‘तुमच्या शरिरात अजून २ – ३ ठिकाणी कर्करोगाच्या पेशी आहेत. त्यासाठी प्रत्येक मासाला ‘इंजेक्शन’ घ्यावे लागेल.
२. कर्करोगावर औषधोपचार घेत असतांना सद़्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर सर्व अडथळे दूर होणे
वरील सर्व प्रक्रिया होत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सद़्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी मला प्रत्येक चाचणीच्या वेळी त्या त्या स्थितीनुसार नामजप दिला. तेव्हा मला ‘गुरुमाऊली सतत माझ्या समवेत आहेत’, असा मोठा आधार वाटला. त्यासह सद़्गुरु गाडगीळकाकांनी मी प्रत्येक वेळी रुग्णालयात जातांना ‘सूक्ष्मातून काय अडथळे येऊ शकतात ?’, हे जाणून ‘त्या त्या वेळी करायचा नामजप आणि तो किती वेळ करायचा ?’, हेही सांगितले आणि सर्व अडथळे दूर केले. त्यानंतर ‘मांडी, माकडहाड आणि पाठीचा कणा, येथे कर्करोगाचे पेशी आहेत’, हे कळल्यापासून सद़्गुरु गाडगीळकाकांनी मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप प्रतिदिन ४ घंटे करायला सांगितला. तेव्हापासून ‘एकही दिवस खंड न पडता हा नामजप गुरुमाऊलीच माझ्याकडून करून घेत आहे’, असे मला जाणवले.
३. सद़्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्यामुळे डाव्या खांद्यापाशी आलेल्या गाठीचा अहवाल ‘नॉर्मल’ येणेे आणि कर्करोगासाठी दिलेल्या नामजपामुळे कर्करोगाचे पेशी शरिरात इतरत्र न पसरणे
त्यानंतर २ मासांपूर्वी माझ्या डाव्या खांद्यापाशी एक गाठ आली आणि ती हळूहळू मोठी होऊन दुखायला लागली. तेव्हा माझ्या सुनेने (सौ. प्रियांका राजहंस, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३६ वर्षे) सद़्गुरु गाडगीळकाकांना ‘माझ्या डाव्या खांद्यापाशी गाठ आली आहे’, हे सांगितल्यावर त्यांनी मला प्रतिदिन १ घंटा त्या गाठीवर हात ठेवून ‘निर्गुण’ हा जप करायला सांगितला. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी ती गाठ पाहून ‘सिटी स्कॅन’ (रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची पहाणी करण्याचे तंत्रज्ञान) करायला सांगितले. सद़्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप केल्यामुळे ‘सिटी स्कॅन’ केल्यावर खांद्याजवळील गाठीचा अहवाल ‘नॉर्मल’ आला. तसेच मांडी आणि पाठीचा कणा येथीलही पेशींमध्ये वाढ झाली नाही’, असे ‘सिटी स्कॅन’मधून लक्षात आले. विशेष म्हणजे दीड वर्षापासून सद़्गुरुकाकांनी मला कर्करोगासाठी नामजप दिला होता. मी तो नामजप केल्यामुळे कर्करोगाचे पेशी कुठेच पसरले नाहीत.
परात्पर गुरु डॉक्टर यांची अनंत कृपा आणि सद़्गुरु गाडगीळकाकांची तळमळ अन् साधकांवरील प्रीती यांमुळे मी या गंभीर आजारातून वाचले आहे, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. वैशाली धनंजय राजहंस (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (२३.४.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |