तिरुवनंतपूरम् (केरळ) – वंशपरंपरागत विश्वस्त किंवा विश्वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याला मंदिरात कर्मचारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते; मात्र त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी विश्वस्तपदावरील दावा सोडावा लागेल, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला.
न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन् आणि न्यायमूर्ती पीजी अजितकुमार यांच्या खंडपिठाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी म्हटले की, वंशपरंपरागत विश्वस्तपद आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील सदस्य मंदिरात नोकरी शोधू शकतात आणि त्यांनी नोकरीसाठी अर्ज करण्यास हिंदु धार्मिक अन् धर्मादाय कायद्याच्या अंतर्गत कोणताही कायदेशीर अडथळा नाही.
येथील श्री कुरुंबा भगवती मंदिर ही मलबार देवस्वोम मंडळाच्या वतीने प्रशासित एक धार्मिक संस्था आहे. या मंदिरातील नोकरीच्या अर्जांसाठीच्या अधिसूचनेमध्ये, जाहिरात केलेल्या पदांपैकी एक ‘कवल’ उपाख्य ‘कथानवेदिकरण’साठी होती. हे कायमस्वरूपी गैर-अनुवंशिक पद आहे. या पदाच्या नियुक्तीविषयी प्रविष्ट केलेली याचिका निकालात काढतांना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.