पुणे येथील पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाची मागणी !
पुणे – मराठा आरक्षणासाठी आंदोलने करणार्या कार्यकर्त्यांविरुद्ध नोंद करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाविषयी केलेल्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात. तसेच आरक्षणाविषयी राज्य सरकारचा शासन निर्णय हा न्यायालयात टिकणारा असावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून १३ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत करण्यात आली. मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, बाळासाहेब आमराळे, अमर पवार आदी या वेळी उपस्थित होते.
कुंजीर म्हणाले की, विविध समाजांसाठी आम्ही केलेले प्रयत्न सर्वांना लाभदायक ठरत आहेत; मात्र आम्ही वाटा मागितला, तर त्याला विरोध केला जात आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. मराठा समाज हा मूळचा शेतकरी असून तो कुणबी आहे. त्याने हातात तलवार घेतल्याने ते मराठा झालेले आहेत.
राजेंद्र कोंढरे म्हणाले की, कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल सकारात्मक आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय करणारा नसावा. जालन्यात आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठीमाराची चौकशी करून तातडीने दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई करावी.
औंध, बाणेर, बालेवाडी येथे आज बंद पाळला !
आरक्षणाच्या मागणीसाठी १४ सप्टेंबर या दिवशी औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरांत बंद पुकारण्यात आला आहे, तर शहरात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मंडईत असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण करण्यात येणार आहे.