जणू भवसागर तरण्‍या देता साहाय्‍याची निश्‍चिती ।

‘१४.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) आश्रमातील सनातनच्‍या ४८ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा ९० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या चरणी साधिकेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली शब्‍दसुमने येथे प्रसिद्ध करत आहोत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

रामनाथी वैकुंठात आले एक संत रत्न ।
साधकांना आनंद देण्‍याचा असे त्‍यांचा यत्न ।
या रत्नाच्‍या केवळ अस्‍तित्‍वामुळे ।
मज प्राप्‍त होत आहे खरे साधकत्‍व ॥ १ ॥

कु. गायत्री जोशी

नावाप्रमाणेच असती त्‍या मनाने निर्मल ।
त्‍यांची गुरुदेवांवर (टीप १) श्रद्धा आहे अविचल ।
सर्व साधकांप्रती असे प्रीती ज्‍यांच्‍या मनी ।
अशा वात्‍सल्‍यमय आहेत पू. निर्मला दातेआजी ॥ २ ॥

जेव्‍हा त्‍यांचे प्रथम दर्शन झाले मजला ।
जाणवले भक्‍त शबरीच आली आश्रमा ।
पू. आजी (टीप २), तुमच्‍या प्रीतीमय स्‍पर्शातूनी ।
बळ मिळते मज जोमाने करण्‍या साधना ॥ ३ ॥

मोह-मायेच्‍या या दुष्‍ट चक्रातूनी ।
पू. आजी, सोडवा मजला लवकरी ।
हात फिरवता तुम्‍ही प्रीतीने माझ्‍या पाठीवरी ।
जणू भवसागर तरण्‍या देता साहाय्‍याची निश्‍चिती ॥ ४ ॥

तुमची प्रेममय दृष्‍टी पडते जेव्‍हा साधकांवरी ।
साधना करण्‍या प्रचंड ऊर्जा ती प्रदान करी ।
सेवेने थकूनी मी तुमच्‍या कुशीत विसावते ।
तेव्‍हा तुमचे आध्‍यात्मिक सामर्थ्‍य मज जाणवते ॥ ५ ॥

आळस या भयंकर शत्रूवरी मात करता तुम्‍ही ।
म्‍हणूनच सदैव उठता ब्राह्ममुहूर्तावरी ।
आदर्श नीतीमान्‍य दिनचर्या तुमची ।
मग गुरुदेवांची का नाही होणार कृपा तुमच्‍यावरी ॥ ६ ॥

माझ्‍यामध्‍ये भाव निर्माण करत आहात तुम्‍ही पू. रेखाताईंप्रती (टीप ३)।
सदैव मजला सांगूनी त्‍यांची महती ।
भावभक्‍ती आणि श्रद्धा यांनी पूर्ण आहात तुम्‍ही ।
मी आध्‍यात्मिक जीवन जगण्‍याचे कारण आहात तुम्‍ही ॥ ७ ॥

गुरुवीण नाही दुजे आपले कुणी याची जाणीव मज दिली ।
सांगून ‘गुरुकृपा साध्‍य होते सदैव अनुसंधानात राहूनी ।
नामरूपी निर्मळ झरा वहाता अंतरी ।
मग मनात भीती रहात नाही कसली’ ॥ ८ ॥

माझ्‍या समवेत नेहमी रहा हो पू. दातेआजी ।
गुरुदेव आपल्‍या रूपात घेतात माझी काळजी ।
गुरुदेवांनी सिद्ध केले हे संत रत्न साधकांसाठी ।
त्‍यासाठी किती कृतज्ञता व्‍यक्‍त करू मी गुरुचरणी ॥ ९ ॥

अशी पवित्रता, निर्मळता, सातत्‍य यावे माझ्‍या अंतरी ।
अशी आर्त प्रार्थना करते गुरुदेव, आपल्‍या चरणी ।
‘पू. आजींना लवकरच विराजमान करावे सद़्‍गुरुपदी’ ।
अशी प्रार्थना करते गुरुचरणी तुमच्‍या वाढदिनी ॥ १० ॥

टीप १ : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

टीप २ : पू. निर्मला दातेआजी

टीप ३ : सनातनच्‍या ६० व्‍या (समष्‍टी) संत पू. रेखा काणकोणकर

माझा पू. दातेआजींच्‍या चरणी भावपूर्ण साष्‍टांग नमस्‍कार !

– कु. गायत्री राजेंद्र जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२३)