पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक अशा विविध ‘अनुमती’ किंवा ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ही आता ‘ऑनलाईन’ मिळतील. त्याकरता महापालिका किंवा पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही. महापालिका आणि पोलीस आयुक्तालय या २ संकेतस्थळांवर अर्ज करता येतील. ही दोन्ही संकेतस्थळे एकमेकांशी जोडलेली (इंटरलिंकिंग) आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
या वर्षापासून गणेशोत्सवासाठी मंडप अनुमतीसाठी ‘ऑनलाईन’ अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ही यंत्रणा महापालिकेच्या ‘माहिती आणि तंत्रज्ञान विभागा’ने विकसित केली आहे. www.pcmcindia.gov.in या लिंकवर सर्व माहिती, प्रक्रिया उपलब्ध होईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिल्या जाणार्या विविध अनुमती, वेळेत आणि सुलभ पद्धतीने देण्याचा महापालिका अन् पोलीस आयुक्तालयाचा मानस आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने दिल्या जाणार्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.