पुणे येथील ‘श्रीराम लागू रंग-अवकाश’च्या कामास प्रारंभ
पुणे – मी मराठीतील अभिनेता असतो, तर अधिक समृद्ध झालो असतो; कारण मराठी भाषेतील साहित्य, कलाकार, लेखक हे सगळेच अव्वल दर्जाचे आहेत. या सर्वांशी विचारांचे आदान-प्रदान झाले असते, तर त्यातून माझ्या क्षमता निश्चितच अधिक रुंदावल्या असत्या, अशा भावना राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एन्.एस्.डी.) अध्यक्ष आणि अभिनेता परेश रावल यांनी व्यक्त केली. ते ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या वतीने ‘ज्योत्स्ना भोळे सभागृहा’च्या इमारतीमध्ये सिद्ध करण्यात येत असलेल्या ‘श्रीराम लागू रंग अवकाश’ या नाट्यगृहाच्या कार्यारंभी बोलत होते.
रावल पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’शी माझे नाते जुने आहे. त्यांचे ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक मी गुजराती भाषेत केले होते, तसेच मराठीतील गाजलेल्या अनेक नाटकांचे प्रयोग आम्ही गुजराती रंगभूमीवर सादर केले आहे. मराठीत उत्तमोत्तम संहिता याव्यात. आजही मुंबईतील कला, संस्कृती ही मराठी माणसांमुळे टिकली आहे.
नाट्यगृहाचे वास्तूरचनाकार माधव हुंडेकर म्हणाले की, ‘श्रीराम लागू रंग अवकाश’ ही जागा ‘ब्लॅक बॉक्स थिएटर’ या संकल्पेनवर आधारित आहे. रंगकर्मींना मनाजोगते नाटक उभे करण्यासाठी नव्या शक्यता खुल्या करणारे हे नाट्यगृह असेल.