ज्‍योतिषाला विचारून करण्‍यात आली होती भारतीय फुटबॉल संघाची निवड !

भारतीय फुटबॉल महासंघाने ज्‍योतिषाला दिले १२ ते १५ लाख रुपये

नवी देहली –  भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्‍टिमॅक यांनी गेल्‍या वर्षी अनेक सामन्‍यांमध्‍ये संघातील खेळाडूंची निवड करण्‍यासाठी ज्‍योतिषी भूपेश शर्मा यांचे साहाय्‍य घेतल्‍याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाचे तत्‍कालीन सरचिटणीस कुशल दास यांनी प्रशिक्षक स्‍टिमॅक आणि ज्‍योतिषी भूपेश शर्मा यांच्‍या भेटीची व्‍यवस्‍था केली होती. याविषयी दास म्‍हणाले की, आम्‍ही संघातील खेळाडूंच्‍या निवडीसाठी ज्‍योतिषी भूपेश शर्मा यांचे २ मास साहाय्‍य घेतले. यासाठी शर्मा यांना १२ ते १५ लाख रुपये देण्‍यात आले.

गेल्‍या वर्षी जूनमध्‍ये आशिया चषक स्‍पर्धेच्‍या पात्रतेसाठीच्‍या अफगाणिस्‍तानविरुद्धच्‍या सामन्‍याच्‍या ४८ घंट्यांपूर्वी प्रशिक्षक स्‍टिमॅक यांनी ११ खेळाडूंच्‍या नावांची सूची ज्‍योतिषी भूपेश शर्मा यांनाही पाठवली होती. ज्‍योतिषी शर्मा यांनी कोणता खेळाडू चांगली आणि कोणता खेळाडू वाईट कामगिरी करील, याची माहिती स्‍टिमॅक यांना दिली होती. प्रत्‍येक सामन्‍यापूर्वी स्‍टिमॅक यांनी संघाला अंतिम स्‍वरूप देण्‍यापूर्वी ज्‍योतिषाकडून माहिती घेतली होती आणि घायाळ, तसेच पर्यायी खेळाडूंविषयीची रणनीतीही सांगितली होती.

संपादकीय भूमिका

ज्‍योतिष हे शास्‍त्र आहे आणि एखादे कार्य अधिक चांगले होण्‍यासाठी त्‍याचे कुणी साहाय्‍य घेत असेल, तर त्‍यात चूक ते काय ?