ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध !
छत्रपती संभाजीनगर – राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून जालना येथे आंदोलन चालू असतांना दुसरीकडे ओबीसी संघटनाही रस्त्यावर उतरणार आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असून ‘ओबीसी समन्वय समिती’ने यासाठी येथे अन्नत्याग आंदोलनाची चेतावणी दिली आहे. १३ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता शहरातील क्रांती चौक येथे हे आंदोलन होणार आहे.
ओबीसी समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील समन्वय समितीच्या पदाधिकार्यांची बैठक ११ सप्टेंबर या दिवशी येथील संत सावता महाराज मंदिरात पार पडली. या वेळी अन्नत्याग आंदोलनाचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणारा अन्याय या संदर्भात चर्चा झाली. या वेळी जनआंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. १३ सप्टेंबर या दिवशीच्या अन्नत्याग आंदोलनात ओबीसींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.