लंडनच्या संग्रहालयात पहाण्यासाठी ठेवणार !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा आणि ऊर्जा सातत्याने प्रत्येक मराठी माणसाला मिळावी, या हेतूने पुण्यातील काही तरुणांनी एकत्रित येऊन सोने, चांदी, तांबे यांसारख्या पंचधातूतून ‘शिववस्त्र’ अर्थात् छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोषाख सिद्ध केला आहे. इंग्लंडमधील मराठी माणसांच्या पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, यासाठी हे ‘शिववस्त्र’ तेथील संग्रहालयात पहाण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. हे शिववस्त्र, तसेच शिवरायांची धोप (तलवार) हे लंडनमध्ये येत्या २६ नोव्हेंबरला नेण्यात येणार आहे. यासाठी ‘कृष्णाई समाजसेवा संस्थे’ने पुढाकार घेतला असून या संस्थेच्या संकल्पनेतील हे ‘शिववस्त्र’ ‘तष्ट’ या संस्थेने ३५ कारागिरांच्या सहकार्याने साकारले आहे. हे ‘शिववस्त्र’ साकारण्यासाठी ६ ते ७ मासांचा कालावधी लागला आहे, अशी माहिती ‘कृष्णाई समाजसेवा संस्थे’चे रवींद्र पवार आणि ‘तष्ट’चे संचालक दीपक माने यांनी दिली.
दीपक माने म्हणाले की, प्राचीन ग्रंथांत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक चित्रांत हा पेहराव दिसतो. हा पोषाख आम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या पोषाखासाठी लागणारे पंचधातू नागरिकांनी स्वखुषीने सुपुर्द केले आहेत.
‘कृष्णाई समाजसेवा संस्थे’चे रवींद्र पवार यांनी सांगितले की, महाराजांची दुर्मिळ चित्रे शोधण्यात आली. त्यांतून महाराजांचे पोषाख निवडण्यात आले. त्याचा इतिहासात उल्लेख शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराजांचा पोषाख सिद्ध करण्याचे ठरवले. ‘कोणत्याही घराण्याचे किंवा कुठल्या एका काळातील शिववस्त्र आहे’, असा दावा आम्ही करत नाही.