१. दुचाकी गाडीने जात असतांना अकस्मात् कुत्रा धडकल्याने गाडीवरून पडणे; मात्र गंभीर दुखापत न होणे : ‘१२.७.२०२३ या दिवशी आम्ही (मी आणि माझी मुलगी कु. सानिका) फोंडा येथे दुचाकी गाडीने जात होतो. दुचाकी गाडी चालू करण्यापूर्वी आम्ही जयघोष केला. नंतर माझ्या मनात ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करावा’, असा विचार आला. त्या वेळी माझ्या गाडीच्या समोरून एक कुत्रा गेला. माझ्या उजव्या बाजूने चारचाकी गाडी आली; म्हणून तो कुत्रा पुढे जाण्याऐवजी पाठीमागे वळला आणि माझ्या दुचाकी गाडीला धडकला. मी आणि सानिका गाडीवरून खाली पडलो. माझा उजवा पाय गाडीखाली येऊन मला खरचटले आणि जखम झाली. सानिकाला काहीही दुखापत झाली नाही.
२. स्थुलातून सर्व काही ठीक असतांनाही प्रारब्धानुसार आलेले संकट : तेव्हा मला वाटले, ‘माझ्या दुचाकी गाडीचा वेग न्यून होता. मी नामजप करत होतो आणि माझे मनही स्थिर होते. स्थुलातून सर्व काही ठीक होते; मात्र तो कुत्रा उलट फिरून गाडीला धडकला. याचा अर्थ त्या दिवशी माझ्या प्रारब्धात हे संकट होते.’
३. सकाळी एका साधिकेने दिलेले प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) देवघरातील निर्माल्यातील चाफ्याचे फूल साधकाने खिशात ठेवणे आणि ‘त्या माध्यमातून गुरुदेवांनी संरक्षककवच निर्माण केले’, असे साधकाला वाटणे : तेव्हा मला आठवले, ‘मी सकाळी सेवेला गेल्यानंतर कु. प्रांजली शिरोडकर या साधिकेने प.पू. गुरुदेवांच्या देवघरातील निर्माल्यातील चाफ्याचे फूल मला दिले होते. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ते फूल मी खिशात ठेवले.’ मला वाटले, ‘गुरुदेवांनी आमचे रक्षण होण्यासाठी सकाळीच ताईच्या माध्यमातून फूल दिले होते.’
मी नंतर याविषयी प्रांजलीताईला भ्रमणभाष करून सांगितले. त्या वेळी ताई म्हणाली, ‘‘एरव्ही मी साधकांना फुले देत नाही; मात्र आज माझ्या मनात विचार आला, ‘काही फुले टवटवीत असल्याने ती साधकांना देऊया’ आणि समोर तुम्ही दिसलात; म्हणून तुम्हाला फूल दिले.’’
‘आपले प्रारब्ध कितीही कठीण असले, तरीही संकट येण्याआधीच गुरुदेव आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण करून आपले प्रारब्ध सुसह्य करतात’, हे मी अनुभवले.
कठीण प्रसंगात सहसाधकांच्या मनात विचार देऊन त्या माध्यमातून साहाय्य करणारे तुम्हीच आहात गुरुदेव ! तुमच्या कृपेनेच आमचे रक्षण झाले, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. सुनील सोनीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |