कोल्हापूर – जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करावी आणि शहर आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत. शहराशी निगडित विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, प्रशासक तथा आयुक्त डॉ.के. मंजुलक्ष्मी यांसह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहराचा हद्दवाढ प्रश्न प्रलंबित आहे, थेट पाणीवाहिनी योजना पूर्णत्वास येऊनही अमृत योजनेच्या टाक्या अपूर्ण असल्याने शहरास पाणी मिळत नसल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी नगररचना विभागाची कार्यप्रणाली पालटणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याचसमवेत शहरातील कचरा व्यवस्थापन, घंटागाड्यांची दुरुस्ती, ‘आपला दवाखाना’ अंतर्गत शहरातील सर्व रुग्णालये चालू करावीत, अशा सूचना केल्या.