मराठा महासंघाचे नेते दिलीप जगताप यांची चेतावणी !
नागपूर – महाराष्ट्र राज्य पुष्कळ मोठे असून मणीपूर लहान राज्य आहे, हे लक्षात ठेवा. सरकारने सर्वपक्षीय बैठकीत मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा महाराष्ट्राचा मणीपूर झाल्याविना रहाणार नाही. महाराष्ट्राचा मणीपूर करायचा नसेल, तर मराठ्यांना आरक्षण द्या. अन्यथा ‘आम्ही एकवेळ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना साहाय्य करू; पण मराठा नेत्यांना निवडणुकीत पराभूत करूनच दम घेऊ’, अशी चेतावणी मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी येथे दिली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या १४ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे ‘आमरण उपोषण’ चालू आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
जगताप पुढे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोचला आहे. त्यात अपयश आले, तर आम्ही मराठा नेत्यांना कुठेही फिरू देणार नाही. त्यांना निवडूनही येऊ देणार नाही. भाजपने आरक्षण दिले, तरी आम्ही त्यांच्यासमवेत राहू; पण ओबीसींना उभे करून मराठ्यांमध्ये दरी निर्माण करू नये. हे परवडणारे नाही.