गोवा : दशकभरात चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍यांची संख्या घटली !

गोवा हस्तकला महामंडळाच्या अनुदान योजनेचा वर्ष २०१२ मध्ये ५२५ मूर्तीकारांनी, तर वर्ष २०२२ मध्ये ३७६ मूर्तीकारांनी लाभ घेतला !

पणजी, १० सप्टेंबर (वार्ता.) – गेल्या दशकभरात चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांची संख्या घटली आहे. गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघुउद्योग विकास महामंडळ चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिमूर्ती १०० रुपये अनुदान देते. यानुसार वर्ष २०१२ मध्ये ५२५ मूर्तीकारांनी याचा लाभ घेतला; मात्र वर्ष २०२२ मध्ये मूर्तीकारांची संख्या घटून ३७६ वर पोचली.

गोवा हस्तकला महामंडळाने मागील ३ वर्षांत चिकणमातीपासून बनवलेल्या सुमारे १ लाख ५२ सहस्र

श्री गणेशमूर्तींसाठी सुमारे १ कोटी ५२ लाख रुपये अनुदानाच्या रूपात वितरित केले आहेत. चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍यांची संख्या घटण्यामागे अनेक कारणे आहेत. गोवा हस्तकला महामंडळ वर्ष २००८ पासून अनुदान देण्याची योजना राबवत आहे आणि गेली १५ वर्षे अनुदानाच्या रकमेत वाढ केलेली नाही. चिकणमातीचा दर वाढलेला आहे. एक ट्रक भरून एवढ्या चिकणमातीची किंमत ३० सहस्र रुपये झालेली आहे. माती मळण्यासाठी कामगार मिळणे कठीण झाले आहे, तसेच कौशल्य असलेल्या मूर्तीकारांची संख्या घटली आहे. कामगारांच्या कमतरतेच्या समस्येवर तोडगा काढतांना गोवा हस्तकला महामंडळाने यंदापासून माती मळण्याची यंत्रे मूर्तीकारांना पुरवली आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे. बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात सहजतेने उपलब्ध होत आहेत. व्यवसाय किंवा नोकरी यांमध्ये व्यस्त असलेल्या युवावर्गाचा श्री गणेश चित्रशाळांमध्ये काम करण्याचा कल न्यून होत चालला आहे. गेल्या अनेक वर्षांत कच्चा मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रतिमूर्ती अनुदान वाढवून ते २५० रुपये प्रतिमूर्ती करण्याची मागणी श्री गणेशमूर्तीकार करत आहेत. तसे केल्यास सरकारला चिकणमातीपासून बनवलेल्या राज्यभरातील अंदाजे १ लाख ५२ सहस्र श्री गणेशमूर्तींसाठी सुमारे ३ कोटी ८० लाख रुपये म्हणजे अडीच पट अधिक अनुदानाच्या रूपात वितरित करावे लागणार आहेत.


हे ही वाचा –

गोवा : प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री केल्यास कठोर कारवाई करणार !
https://sanatanprabhat.org/marathi/718261.html

संपादकीय भूमिका

  • समाजाला चिकणमातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती पूजल्यास होणारा वैज्ञानिक आणि अध्यात्मशास्त्रीय लाभ सांगणे हाच यावरील उपाय आहे.
  • प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेली मूर्ती पाण्यात विसर्जित होत नाही. ती पाण्यावर तरंगत राहिल्याने श्री गणेशाचे विडंबन होते.
  • गोमय किंवा गोमूत्र यांमध्ये मुळातच गोमातेचे तत्त्व असते. शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही. त्यामुळे गोमयात गणेशतत्त्व आकृष्ट होत नाही. अशाच प्रकारे इतर कोणत्याही वस्तूंपासून बनवलेली मूर्ती पुजू नये.
  • हल्ली कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीचा प्रचार केला जातो; पण ही मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते आणि मासेही मरतात. त्यामुळे हरित लवादाने अशा मूर्तींवर बंदी घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे चिकणमातीपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती किंचित अधिक किमतीची असली, तरी त्यातून श्री गणेशतत्त्व अधिक प्रमाणात मिळून श्री गणेशाची कृपा संपादन करता येईल !