सांगली – सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सहस्रो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली ‘सातारा-कोल्हापूर’ पॅसेंजर सध्या प्रवाशांची परीक्षा पहात आहे. ८ सप्टेंबरला गाडीची ‘ब्रेकिंग यंत्रणा’ निकामी झाल्याने ती हातकणंगले स्थानकात बराच काळ थांबली. यानंतर ती ४० किलोमीटर प्रतिघंटा या वेगाने कशीतरी कोल्हापूर स्थानकापर्यंत नेण्यात आली. बिघाडामुळे ही गाडी दीड घंटे विलंबामुळे कोल्हापूर स्थानकामध्ये पोचली. त्यामुळे नोकरवर्ग, विद्यार्थी आणि इतर प्रवासी वर्ग यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या संदर्भात प्रवाशांनी हातकणंगले स्थानकात तक्रार पुस्तकात रीतसर तक्रार नोंदवली. काही दिवसांपासून पॅसेंजर गाडीमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या गाडीची क्षमता १ सहस्र असतांना यातून २ सहस्रांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. सातत्याने ही गाडी विलंबाने धावत असल्याने नोकरवर्ग, प्रवासी यांना मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही डबे वाढवले जात नाहीत आणि त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. ‘ही पॅसेंजर म्हणजे मुंबईची लोकल झाली आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकाप्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासन कधी पुढाकार घेणार ? |