आम्‍ही ‘भारतीय’ आहोत, ‘इंडियन’नाही ! – कंगना राणावत, अभिनेत्री

कंगना राणावत, अभिनेत्री

मुंबई – इंग्रजांनी आपल्‍याला ‘इंडियन’ हे नाव दिले. जुन्‍या शब्‍दकोशांमध्‍ये ‘इंडियन’चा अर्थ ‘गुलाम’ असा सांगितला जातो; परंतु आता आम्‍ही हे नाव पालटले आहे. ‘इंडियन’ हे आपले नाव नाही. आम्‍ही भारतीय आहोत, इंडियन नाही, असे ट्‍वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे.

नवी देहली येथे होणार्‍या ‘जी २०’च्‍या बैठकीच्‍या रात्रीच्‍या भोजनासाठी राष्‍ट्रपतींनी पाठवलेल्‍या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिटेंड ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिटेंड ऑफ भारत’ असे लिहिण्‍यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर कंगना राणावत यांनी वरील ‘ट्‍वीट’ केले आहे. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटले आहे, ‘‘इंडिया’ या नावाचा अर्थ काय आहे ? या नावावर प्रेम करण्‍यासारखे काय आहे ? मुळात इंग्रजांना ‘सिंधु’ या नावाचा उच्‍चार करता आला नाही. सिंधु नाव बिघडवून त्‍यांनी ‘इंडस’ किंवा ‘हिंदोस’ असे म्‍हटले. महाभारताच्‍या काळात महायुद्धात सहभागी झालेली सर्व राज्‍ये ‘भारत महाद्वीप’ या नावाने ओळखली जात होती. देशाचे ‘भारत’ हेच नाव अतिशय योग्‍य आहे.’’

या ट्‍वीटसमवेत कंगना राणावत यांनी २ वर्षांपूर्वी केलेल्‍या त्‍यांच्‍या ट्‍वीटची ईमेजही जोडली आहे. यामध्‍ये ‘इंडिया हे नाव इंग्रजांपासून मिळाले आहे. त्‍यामुळे देशाचे नाव भारत असायला हवे’, असे लिहिले आहे. त्‍याखाली ‘सर्वांना शुभेच्‍छा ! आपण सर्व गुलामगिरीच्‍या नावापासून मुक्‍त झालो. जय भारत’.

संपादकीय भूमिका :

भारताविषयी असा अभिमान किती खेळाडू आणि अभिनेते यांना आहे ?, याचे निरीक्षण करा !