पुणे – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळत असले, तरी सुविधांअभावी रुग्ण तेथे जात नाहीत. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आराखडा सिद्ध केला असून प्रमुख ३ रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्य, पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपचार अन् सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. रुग्णालयातील खाटांची संख्याही १६० ने वाढणार आहे. कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय यांचा यामध्ये समावेश आहे. दुसर्या टप्प्यात सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालय, शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालय, हडपसर येथील मगर रुग्णालय यांचा समावेश केला जाणार आहे.
खासगी आस्थापनांनी साहाय्याची सिद्धता दर्शवल्याने निधी, उपकरणे आणि वैद्यकीय साहित्य खरेदी केली जाईल. महापालिकेच्या प्रमुख ३ रुग्णालयांत अत्याधुनिक उपचार देता यावेत, यासाठी या आराखड्याला आयुक्तांनी तत्त्वतः संमती दिली आहे. २ मासांत तज्ञ, आधुनिक वैद्य आणि इतर कर्मचारी यांची नियुक्ती करणार असल्याचे महापालिकेचे साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाप्रशासनाने महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांची स्थिती तातडीने सुधारून जनतेला अत्यावश्यक सुविधा देणे आवश्यक आहे. ही स्थिती पालटण्यासाठी अगोदरच प्रयत्न का झाले नाहीत ? |