श्रीकृष्‍णाचा भावप्रयोग करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

माझी आई सौ. शालिनी पांडुरंग सावंत (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के) प्रतिदिन एक भावप्रयोग करते. आई नियमित तोच एक भावप्रयोग करते. ती करत असलेला भावप्रयोग तिने मला सांगितल्‍यावर मीही तोच भावप्रयोग केला. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. भावप्रयोगाच्‍या वेळी ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चैतन्‍याने संपूर्ण देहाची शुद्धी होत आहे’, असा भाव ठेवणे

‘आई पुढील भावप्रयोग करते. ‘ती सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या खोलीत जाते. तिथे ती त्‍यांच्‍या पावन चरणांवर फुले अर्पण करते. त्‍यानंतर ते तिच्‍या डोक्‍यावर हात ठेवतात. त्‍यांच्‍या हातातून निघणारे चैतन्‍य तिच्‍या डोक्‍यातून शरिरात प्रवाहित होऊ लागते. ते चैतन्‍य डोळ्‍यांमध्‍ये येते. त्‍या वेळेस तिला डोळ्‍यांनी सर्वत्र परात्‍पर गुरु डॉक्‍टर दिसतात. चैतन्‍य कानांत आल्‍यावर तिला श्रीकृष्‍णाच्‍या बासरीची धून किंवा दैवी नाद ऐकू येतो. नंतर ते चैतन्‍य नाकाजवळ आल्‍यावर नाकावाटे दैवी सुगंध येतोे. चैतन्‍य मुखात येते, त्‍या वेळेस ती परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे गुणगान गाते. त्‍यानंतर ते चैतन्‍य खाली हृदयापर्यंत प्रवाहित होते. तिच्‍या हृदयाची सर्व प्रक्रिया चैतन्‍याने भारित होते आणि हे चैतन्‍य रक्‍तावाटे पूर्ण देहात प्रवाहित होते. नंतर तिला तिच्‍या हृदयमंदिरात मध्‍यभागी परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि त्‍यांच्‍या एका बाजूला श्रीकृष्‍ण अन् दुसर्‍या बाजूला प.पू. भक्‍तराज महाराज स्‍थानापन्‍न झालेले दिसतात. ते चैतन्‍य नंतर पोटात जाते. तिथे ‘चैतन्‍य’ सर्व आतड्यांवरील त्रासदायक आवरण दूर करून ते चैतन्‍याने भारित होते. नंतर चैतन्‍य नाभीचक्रातून दोन्‍ही मूत्रपिंडांत जाऊन मूत्रपिंडे चैतन्‍याने शुद्ध होतात. ते चैतन्‍य खाली पायांपर्यंत पूर्ण जाऊन संपूर्ण देह शुद्ध होतो.

२. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर आलेल्‍या महामृत्‍युयोगाचे संकट दूर होण्‍यासाठी आईने केलेली प्रार्थना श्रीकृष्‍णाने स्‍वीकारणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

त्‍यानंतर परात्‍पर गुरु डॉक्‍टर आईला श्रीकृष्‍णाकडे घेऊन जातात आणि आई श्रीकृष्‍णाच्‍या चरणी बसून प्रार्थना करते. ‘आतापर्यंत ज्‍या काही प्रार्थना केल्‍या, त्‍या सर्व परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनाच केल्‍या आहेत. आज मी तुझ्‍या चरणी प्रार्थना करते, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या व्‍यतिरिक्‍त आमच्‍या जीवनात कुणी नाही. तेच सर्वकाही आहेत. तेच आमचे सर्वस्‍व आहेत. त्‍यांच्‍यावर आलेले महामृत्‍युयोगाचे संकट तू दूर कर. त्‍यांना चांगले आरोग्‍य आणि दीर्घायुष्‍य लाभू दे आणि मला माझ्‍या शेवटच्‍या श्‍वासापर्यंत त्‍यांच्‍या चरणी ठेव’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना आहे.’ श्रीकृष्‍ण आईची प्रार्थना स्‍वीकारतो आणि तिला आशीर्वाद देतो. नंतर परात्‍पर गुरु डॉक्‍टर आईला परत आश्रमात घेऊन येतात.

३. भावप्रयोग करतांना साधकाने ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांसमवेत श्रीकृष्‍णलोकात जात आहे’, असे अनुभवणे

त्‍यानंतर काही कालावधीनंतर मीही वरील भावप्रयोग करण्‍यास आरंभ केला. ‘मी सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या खोलीत जात आहेे. तेव्‍हा ते मला म्‍हणत आहेत, ‘तुला श्रीकृष्‍णाला भेटायला श्रीकृष्‍णलोकात जायचे आहे ना ? मग इथे बस.’ मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या समोर त्‍यांच्‍या पावन चरणांना पकडून बसत आहे. मी आईने सांगितल्‍याप्रमाणे सर्व भावप्रयोग करत आहे. नंतर परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणत आहेत, ‘आता तू श्रीकृष्‍णलोकाच्‍या प्रवासाकडे जाण्‍यास सिद्ध झाला आहेस.’ नंतर ते मला त्‍यांच्‍या डावीकडे उभे रहाण्‍यास सांगत आहेत. त्‍यांनी माझा हात घट्ट पकडला आहे. त्‍यांनी मला माझे डोळे बंद करण्‍यास सांगून काही सेकंदाने तेे उघडण्‍यास सांगितले. डोळे उघडल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि मी आकाशात पुष्‍कळ वर असल्‍याचे मला दिसले. तिथून रामनाथी आश्रम लहानसा दिसत आहे. आम्‍ही जसजसे वर आकाशात जातो, तसतसे पूर्ण आकाशमंडल परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या अस्‍तित्‍वामुळे आनंदी होत आहे. वायुदेवता आनंदी होऊन मंदपणे वहात आहे. सर्व पक्षी आनंदाने उडत आहेत.

४. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या समवेत श्रीकृष्‍णलोकात जाणे, मार्गात देवता आणि काही जीव त्‍यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी करतांना दिसणे, तर काही जीव स्‍वतःच्‍या उद्धारासाठी प्रार्थना करतांना दिसणे

सौ. शालिनी सावंत

नंतर ‘ते मला पृथ्‍वीच्‍या मंडलातून बाहेर नेत आहेत’, असे दिसले. पृथ्‍वीमंडलातून बाहेर आल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर सांगत आहेत, ‘पृथ्‍वीच्‍या आकाशमंडलातून बघ पृथ्‍वी कशी दिसत आहे ! दर्शन घे.’ मी पृथ्‍वीचे दर्शन घेत आहे. नंतर परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला श्रीकृष्‍णलोकाच्‍या दिशेने घेऊन जात आहेत. तेव्‍हा मला दिसले आणि वाटले, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे ‘मनोहर रूप’ पहाण्‍यासारखे आहे. त्‍यांच्‍या गळ्‍यातील हार, त्‍यांचा सदरा आणि त्‍यांचे केस वार्‍याने हळूहळू हलत आहेत. त्‍यांचे रूप मी पहात आहेे. ‘त्‍यांचे ते रूप अखंड पहातच रहावे’, असे मला वाटत आहे. मी त्‍यांना म्‍हणत आहे, ‘असेच मला तुमच्‍यासमवेत संपूर्ण ब्रह्मांड फिरायला मिळाले; तरी मला चालेल.’ ते श्रीकृष्‍णलोकाकडे प्रवास करत आहेत. त्‍या वेळी अनेक जीव त्‍यांच्‍या दर्शनासाठी दोन्‍ही बाजूंना उभे आहेत. कुणी आरती करत आहे. कुणाचा भाव जागृत झाला आहे. सर्वांची तळमळीने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना आर्त प्रार्थना होत आहे, ‘आमचा उद्धार करा.’ परात्‍पर गुरु डॉक्‍टर सर्वांना आशीर्वाद देत आहेत. देवता त्‍यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी करत आहेत. काही जीव त्‍यांच्‍या चरणांवर पुष्‍पे वहात आहेत.

५. परात्‍पर गुरुदेव प्रत्‍येक गोपीसमवेत रासलीला करत असल्‍याचे दाखवून श्रीकृष्‍णाने तो आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर एकच असल्‍याचे दाखवून देणे

श्री. अभिजित सावंत

आम्‍ही श्रीकृष्‍णलोकाच्‍या द्वारापाशी पोचलो. तेव्‍हा श्रीकृष्‍ण आणि गोपगोपी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या स्‍वागतासाठी उभे होते. नंतर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना गोपगोपी त्‍यांच्‍यासमवेत घेऊन गेले. त्‍या वेळी श्रीकृष्‍ण मला म्‍हणत आहे, ‘तुला मला भेटायचे आहे ना ? तू माझ्‍यासमवेत ये.’ श्रीकृष्‍ण मला त्‍याच्‍या दालनात घेऊन जात आहे. मी श्रीकृष्‍णाच्‍या चरणी बसून आईने सांगितल्‍याप्रमाणे प्रार्थना करत आहे, ‘श्रीकृष्‍णा, तू अनेक अवतार घेतलेस आणि पुढेही तू अनेक अवतार घेशील. तू या वेळेस परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या रूपात अवतार घेतला आहेस; पण या अवताराला म्‍हणजेच परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना देहाच्‍या मर्यादा आल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर महामृत्‍युयोगाचे जे संकट आले आहे. ते तू दूर कर. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आमच्‍यासाठी सर्वस्‍व आहेत. त्‍यांच्‍याविना आमचे दुसरे कुणी नाही. तूच त्‍यांना उत्तम आरोग्‍य आणि दीर्घायुष्‍य दे.’ श्रीकृष्‍ण यावर मला आशीर्वाद देऊन ‘तथास्‍तु ।’, असे म्‍हणतो.  तो मला म्‍हणत आहे, ‘तू  मला प्रार्थना केलीस’; पण मी तुला एक गंमत दाखवतो. त्‍यानंतर श्रीकृष्‍ण मला जिथे परात्‍पर गुरु डॉक्‍टर आहेत, तिथे घेऊन जात आहे आणि दाखवत आहे. मी बघतो, तर काय ? परात्‍पर गुरु डॉक्‍टर प्रत्‍येक गोपगोपीसमवेत रासलीला खेळत आहेत. प्रत्‍येक गोपीसमवेत परात्‍पर गुरु डॉक्‍टर दिसत आहेत. हे दाखवून श्रीकृष्‍ण मला सांगत आहे, ‘मी आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर वेगळे नसून आम्‍ही एकच आहोत.’

६. देवीच्‍या ठिकाणी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे दर्शन होणे, तेव्‍हा ‘सर्व देवता आणि आदिशक्‍ती म्‍हणजे ब्रह्मांडनायक परात्‍पर गुरु डॉक्‍टर आहेत’, असे श्रीकृष्‍णाने दाखवणे

पुढे श्रीकृष्‍ण म्‍हणत आहे, ‘अजून एक गोष्‍ट दाखवतो.’ श्रीकृष्‍ण मला अजून एका ठिकाणी घेऊन जात आहे. तो आदिशक्‍तीदेवीचा लोक आहेे. देवी ध्‍यानस्‍थ बसली आहे. श्रीकृष्‍ण म्‍हणतो, ‘त्‍या देवीकडे बघ. डोळे बंद कर आणि पुन्‍हा उघड. त्‍या वेळी मला देवीच्‍या ठिकाणी परात्‍पर गुरु डॉक्‍टर दिसत आहेत. ‘मध्‍येच देवी आणि मध्‍येच परात्‍पर गुरु डॉक्‍टर’, असे दृश्‍य मला दिसत आहे. या प्रसंगात श्रीकृष्‍णाने मला दाखवून दिले, ‘सर्व देवता, आणि साक्षात् आदिशक्‍ती म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरच आहेत.’ तेच हे ब्रह्मांड चालवत आहेत. ज्‍यांच्‍या आज्ञा आणि सेवा यांची संधी मिळण्‍यासाठी सर्व देवता आतुरतेने वाट पहात आहेत, ते दुसरे कुणी नसून ‘ब्रह्मांडनायक परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले’ आहेत.

७. श्रीकृष्‍णाने ‘परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले लोक’ दाखवणे आणि तिथे संत अन् साधक यांच्‍या भेटी होणे

त्‍यानंतर श्रीकृष्‍ण म्‍हणतो, ‘अजून एक महत्त्वाची गोष्‍ट तुला दाखवायची आहे. श्रीकृष्‍ण मला एका दुसर्‍या लोकाजवळ घेऊन जात आहे. त्‍या लोकाच्‍या आतून लालसर तेजस्‍वी प्रकाश बाहेर पडत आहे. ते तेज इतके आहे की, मला डोळे उघडता येत नाहीत.’ तसे मी श्रीकृष्‍णाला सांगत आहे. तेव्‍हा श्रीकृष्‍ण माझ्‍या डोक्‍यावर हात ठेवून ते तेज सहन करण्‍याची मला शक्‍ती देतो. शक्‍ती दिल्‍यावर मी पहातो, तर त्‍या लोकाच्‍या द्वारावर ‘परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले लोक’, असे लिहिले आहे. श्रीकृष्‍ण आणि मी द्वारापाशी गेल्‍यावर देहत्‍याग केलेलेे सर्व सद़्‍गुरु, संत आणि साधक मला भेटत आहेत. परात्‍पर गुरु देशपांडेकाका, परात्‍पर गुरु पांडे महाराज, पू. सखदेव आजी इत्‍यादी दिसत आहेत. ज्‍या साधकांचा ६१ टक्‍के स्‍तर झाला नाही; पण जेे पृथ्‍वीलोकात साधना करत होते, तेही साधक तिथे त्‍या लोकाच्‍या बाहेर सेवा करत आहेत आणि ते सर्व जण साधना करत आहेत. ‘त्‍यामुळे तिथले तेज वाढले आहे’, असे मला वाटत आहे.

सर्व साधक श्रीकृष्‍णाची पाद्यपूजा करून स्‍वागत करत आहेत. सर्व साधकांना ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर श्रीकृष्‍णलोकात आले आहेत’, हे समजले आहे. श्रीकृष्‍ण आणि आम्‍ही सर्व जण परत श्रीकृष्‍णलोकात आलो. सर्व साधक परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना भेटत आहेत. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि सर्व साधक पुष्‍कळ आनंदी आहेे. परात्‍पर गुरु डॉक्‍टर सर्वांना ‘आता निघायला हवे. खाली पृथ्‍वीवर सेवा आहे’, असे सांगत आहेत. मी आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर परत पृथ्‍वीच्‍या दिशेने निघालो. तेथे पुन्‍हा देवता, ऋषी आणि अनेक जीव परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांचे दर्शन घेण्‍यासाठी उभे आहेत. परात्‍पर गुरु डॉक्‍टर सर्वांना आशीर्वाद देत आहेत आणि माझा हात धरून पृथ्‍वीलोकात प्रवेश करत आहोत. आम्‍ही आश्रमाच्‍या जवळ आल्‍यावर त्‍यांनी मला डोळे बंद करून काही क्षणांनंतर ते उघडण्‍यास सांगितले. ते आणि मी त्‍यांच्‍या खोलीत आलो आहेे. मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करून खोलीच्‍या बाहेर येत आहे.’

८. भावप्रयोग पूर्ण झाल्‍यावर कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टर, ‘तुमच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली किंवा स्‍वतःचे सर्वस्‍व जरी अर्पण केले, तरी मी ऋण फेडू शकणार नाही. ‘तुम्‍ही कोण आहात ?’, हे या अनुभूतीतून तुम्‍ही माझ्‍यात रुजवले आहे. तुम्‍ही एकदा एखाद्याचा हात धरलात, तर तो कधीच सोडत नाही. तुम्‍ही सर्व जिवांचा पृथ्‍वीवर असतांना आणि मृत्‍यूनंतरही सर्वतोपरी उद्धार केल्‍याविना त्‍यांना सोडत नाही’, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे. पुढे अनेक वेळा सिद्ध होत रहाणार आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टर, तुमच्‍या चरणी कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !’

– श्री. अभिजित सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.११.२०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.