५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. अर्पिता धुमाळ (वय १० वर्षे) !

सातारा येथील कु. अर्पिता नयन धुमाळ हिची तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अर्पिता धुमाळ

१. गरोदरपण

‘मी गरोदर असतांना आम्ही भांडुप (मुंबई) येथे रहात होतो. तेव्हा मी प्रतिदिन सत्संग आणि सेवेला चालत जायचे; पण मला कोणताही त्रास झाला नाही. सत्संग आणि सेवा यांतून गर्भावर नामजपाचा संस्कार झाला. स्तोत्र ऐकतांना आणि नामजप करतांना बाळाची हालचाल होऊन प्रतिसाद मिळत असे.

२. वय १ ते ४ वर्षे

अ. अर्पिताचे मराठी हस्ताक्षर सुरेख आहे.

आ. तिचे बालपणापासून पाठांतर चांगले आहे. ती ४ वर्षांची असतांना प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेली पूर्ण प्रार्थना तिला पाठ होती.

इ. तिला नामजपादी उपाय करायला आवडतात.

सौ. वनिता धुमाळ

३. वय ४ ते १० वर्षे 

३ अ. परिस्थिती स्वीकारणे : कोरोना महामारीच्या काळात ती इयत्ता दुसरीमध्ये होती. तेव्हा आम्ही भांडुप (मुंबई) सोडून आमच्या मूळ गावी सातारा येथे आलो. तिला मुंबईमध्ये रहाण्याची सवय असतांना तिने सातार्‍यात लगेच जुळवून घेतले.

३ आ. हुशार

१. तिला हनुमान चालीसा, मारुतिस्तोत्र आणि सर्व आरत्या पाठ आहेत.

२. शालेय अभ्यासातही ती हुशार आहे. ती चौथी इयत्तेत असतांना आमचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भेट देण्याचे नियोजन झाले. त्यानंतर तिने शाळेची परीक्षा दिली. तरीही तिला ९२ टक्के गुण मिळाले.

३ इ. व्यष्टी साधना : ती प्रतिदिन २ पाने नामजप लिहिते. रात्री झोपतांना नामजपाचे मंडल करते. तिला चूक सांगितल्यावर ती क्षमा मागते.

३ ई. कृतज्ञताभाव : अर्पिताने लहानपणापासून सर्व सत्संग ऐकले आहेत. त्यामुळे तीच मला दृष्टीकोन देते. तिच्यातील भावामुळे कोरोना काळातील सर्व त्रास सुसह्य झाले. आमचे त्रास संपल्यावर तिने कृतज्ञता व्यक्त केली.

३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : तिचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. ती सतत त्यांची चित्रे रेखाटत असते. एकदा त्यातील एक चित्र गुरुदेवांनी हातात घेतले. तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला.

४. अनुभूती

५ अ. रामनाथी आश्रमात जाण्यासाठी हट्ट करणे आणि शाळेतून जाण्याची अनुमती मिळणे : आमचे रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन चालू होते. तेव्हा मी आणि माझ्या मोठ्या मुलीचे आरक्षण केले होते. अर्पिताची वार्षिक परीक्षा असल्यामुळे ती आणि तिचे बाबा घरी रहाणार होते; पण जाण्याचा दिवस आल्यावर अर्पिता पुष्कळ रडायला लागली. ‘मला पेपर नाही द्यायचे. मला रामनाथी आश्रमात यायचे आहे’, असे ती म्हणत होती. जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘नियोजनात पालट करणे अशक्य आहे.’’ तसेच अर्पिताच्या शाळेतून तिला अनुमतीही मिळत नव्हती. काय करावे कळत नव्हते. ती पुष्कळ रडत होती. मी नंतर जायला मिळेल; म्हणून तिला समजावले. नंतर अकस्मात् १० ते १५ मिनिटांत जिल्ह्यातील उत्तरदायी साधिकेचा मला भ्रमणभाष आला. तिचे नाव अगोदर दिलेले आहे; म्हणून तिला जायला मिळेल. त्या दिवशी रविवार असूनही तिच्या वर्गशिक्षकांनी भ्रमणभाष उचलला आणि तिला जाण्याची अनुमती दिली. तिची तळमळ गुरुदेवांपर्यंत पोचली. तेव्हा कृतज्ञतेने भरून आले.

५. अर्पितामध्ये जाणवणारे स्वभावदोष

मोठ्याने ओरडणे, हट्टीपणा आणि आळस.

‘गुरुदेवा, आपल्याच कृपने अशी दैवी बालिका आम्हाला मिळाली; पण मी तिच्यावर संस्कार करण्यात अल्प पडत आहे. ‘आपणच तिला बुद्धी द्या आणि कृपा करा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वनिता नयन धुमाळ, सदरबाजार, सातारा. (१९.५.२०२३)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्‍हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्‍या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक