‘जेट एअरवेज’चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक !

कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण

नरेश गोयल

मुंबई – ‘जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड’ आस्थापनाचे संस्थापक नरेश गोयल (वय ७४ वर्षे) यांनी कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केली. याच्याशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ (काळा पैसा पांढरा करणे) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्यांना अटक केली.

गोयल यांना १ सप्टेंबर या दिवशी ‘ईडी’च्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँन्ड्रिंग ॲक्ट’ कायद्यान्वये अटक करण्यात आली. यापूर्वी ‘ईडी’ने त्यांना दोनदा बोलावल्यानंतरही ते आले नव्हते. केंद्रीय अन्वेषण विभागाने या वर्षी मे मासात प्रविष्ट केलेल्या तक्रारीवर हे प्रकरण आधारित आहे. नरेश गोयल यांची पत्नी अनिता, ‘जेट एअरवेज एअरलाइन्स’चे माजी संचालक गौरांग शेट्टी आणि अन्य काही जण या प्रकरणात आरोपी आहेत.

संपादकीय भूमिका

बँकांची फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडतात. सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !