रत्नागिरी येथील कु. मृण्मयी महेश कात्रे यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतांना आलेल्या अनुभूती

१. भगवंताच्या कृपेने ‘ऑनलाईन’ स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होणे

कु. मृण्मयी कात्रे

‘मी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना प्रासंगिक सेवांमध्ये सहभाग घेत असे. तेव्हा गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली जायची. ती प्रात्यक्षिके पाहून ‘आपणही याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावेे’, असा विचार माझ्या मनात नेहमी यायचा. त्यानंतर ‘ऑनलाईन’ स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू झाले. त्यामध्ये भगवंताच्या कृपेने मला सहभागी होता आले.

२. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेत असतांना प्रशिक्षणवर्ग घेण्याची इच्छा होणे आणि गुरुदेवांच्या कृपेने प्रशिक्षणवर्ग घेण्याची संधी मिळणे

स्वसंरक्षण वर्गामध्ये सहभागी झाल्यावर मला ‘वर्ग केव्हा चालू होणार ? त्यामध्ये नवीन काय शिकायला मिळणार ?’, अशी उत्सुकता असायची. सलग ७ दिवस वर्ग झाल्यानंतर हा ‘प्रशिक्षणवर्ग नियमित व्हायला हवा’, असे मला वाटू लागले. त्यानंतर देवाच्या कृपेने साप्ताहिक वर्ग चालू झाले. त्यामध्ये कोल्हापूर येथील श्री. नीलेश शेट्ये, तसेच रत्नागिरीतील कु. नारायणी शहाणी आणि कु. नयना दळवी आम्हाला शिकवत होते. देवानेच माझ्याकडून प्रतिदिन सराव करून घेतला. वर्गामध्ये प्रायोगिक आणि तात्त्विक, असे २ भाग असायचे. थोडे दिवस वर्ग झाल्यावर पुन्हा माझ्या मनामध्ये विचार आले, ‘आता मलाही वर्ग घ्यायचा आहे. ताई जसे आपल्याला शिकवते, तसे आपणही वर्ग घेऊन इतरांना शिकवावे.’ त्याच दिवशी संध्याकाळी मला वर्ग घेणार्‍या दादांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी मला विचारले, ‘‘या पुढील वर्गात तुम्ही कराटेेचेे प्रकार करून दाखवण्याचा प्रयत्न करणार का ?’’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. ‘गुरुदेवच माझ्या अंतर्मनातील विचार ओळखून मला संधी देत आहेत’, याची अनुभूती मला आली.

३. गुरुकृपेने वर्गात तात्त्विक भागही शिकवता येणे

‘या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात मला तात्त्विक भागही मांडता यायला हवा’, असे मला वाटू लागले. त्या वेळी ‘प्रत्येक विषय समर्पकपणे कसा मांडायचा ? हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येकाच्या मनात कशी बिंबवायची ?’, हेसुद्धा गुरुदेवांनी मला सूक्ष्मातून सुचवले. त्यानंतर मला तात्त्विक भाग मांडायची संधीही मिळाली.

४. प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत सेवा करतांना ‘एखादी सेवा स्वतः करावी’, असे वाटणे आणि गुरुकृपेने ती सेवा करण्याची संधी मिळणे

प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत सेवा करतांना पुष्कळ वेळा ‘आपल्याला ही सेवा करता आली पाहिजे’, असे मला वाटायचे. त्यानंतर गुरुदेव ‘ती सेवा कशी करायची ?’, याविषयी मला अनेक सूत्रे सुचवायचे. माझ्याकडून या सेवेची व्याप्ती काढून झाल्यावर प्रशिक्षकांचा मला भ्रमणभाष यायचा आणि ते म्हणायचे, ‘‘ताई, तू ही सेवा करू शकतेस का ?’’ गुरुदेवांनी पूर्वसिद्धता करून घेतल्यामुळे माझ्याकडून ते सहजतेने स्वीकारले जायचे.

‘प्रत्येक सेवा दायित्व घेऊन, परिपूर्ण आणि गुरुदेवांना अपेक्षित, अशी व्हायला हवी’, यासाठी गुरुदेवांनी माझ्याकडून प्रयत्न करून घेतले आणि मला आनंद अनुभवता आला’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा होऊन मला त्यांच्या चरणी समर्पित होता येऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मृण्मयी महेश कात्रे, चिपळूण, रत्नागिरी. (२६.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक