नगर – संतांच्या हातून लिहिले गेलेले साहित्य परिसासारखे प्रभावी असते. त्यात मानवी जीवनाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी संत साहित्याचा सहवास आवश्यक आहे, असे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी सांगितले. सावेडीतील नारदीय कीर्तन प्रसारक मंडळाने कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. या वेळी श्री. ऋषिकेश धर्माधिकारी यांनी स्वागत केले.
ह.भ.प. आफळेबुवा पुढे म्हणाले, ‘‘आपल्या घरातील मुलांना प्रतिदिन संतांचा एक तरी अभंग आणि हरिपाठातील एक अभंग म्हणावयास लावा. ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध या ग्रंथांची पारायणे घरात चालू ठेवा. त्यातून पुढील पिढीवर पारायण करण्याचा संस्कार घडेल. हा संस्कार सामर्थ्य प्रदान करत राहील. लग्नाच्या बैठकीत देणे-घेणे आणि मानपान यांपेक्षा घराण्यातील उपासना, व्रतवैकल्ये, परंपरा, संस्कृती यांवर चर्चा झाली, तर मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अन् राष्ट्रीय पातळीवर शांतता नांदेल.’’