मुंबई, ३० ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील सर्व विद्यापिठांच्या अभ्यासक्रमात समानता रहावी, यासाठी राज्यशासनाने २९ ऑगस्टला राज्यातील विद्यापिठांच्या कुलगुरूंची समन्वय समिती गठीत केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्व विद्यापिठांचा अभ्यासक्रम सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही समिती समन्वय ठेवणार आहे. मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, मुंबईतील एस्.एन्.डी.टी. विद्यापीठ या विद्यापिठांच्या कुलगुरूंना या समितीचे सदस्य केले आहे. या समितीचा कार्यकाळ २ वर्षांचा असून १ मासामध्ये समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.