सोलापूर, २४ ऑगस्ट (वार्ता.) – मणीपूर, देहली आणि मेवात (हरयाणा) दंगलीत सहभागी दंगलखोरांवर ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा’, ‘संघटित गुन्हेगारी’, ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ आदी कठोर कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात यावेत. देशभरात अनेक ठिकाणी अशी हिंसक आक्रमणे होत आहेत. या माध्यमातून देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि शांतता नष्ट करण्याचे षड्यंत्र चालू आहे. या दंगलीचे सर्व ‘व्हिडिओ’ गोळा करून संवेदनशील क्षेत्रात कोबिंग ऑपरेशनही करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केले. ते येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या वेळी बोलत होते. समितीच्या कु. वर्षा जेवळे, श्री. बालराज दोंतुल, श्री. धनंजय बोकडे, सौ. स्नेहा भोवर, श्री. शिवबा शहापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाला पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.
या वेळी श्री. राजन बुणगे म्हणाले की,
१. न्यायालयाच्या एका निर्णयाला विरोध करण्याचे निमित्त करून मागील ४ मासांपासून ईशान्येकडील मणीपूरमध्ये कुकी (ख्रिस्ती) समाजाकडून नियोजनपूर्वक हिंसाचार घडवून काश्मीरप्रमाणे मणीपूर हिंदूविहिन करण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १४१ लोकांचा मृत्यू झाला असून हिंदू मैतेई समाजाचा ‘सांस्कृतिक नरसंहार’ चालू आहे. यात चीन, युरोपिय युनियन यांच्यासारख्या अनेक विदेशी शक्ती कार्यरत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
२. नुकतेच देहलीतील मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी नियोजनपूर्वक हिंसाचार करून लहान मुलांच्या माध्यमातून हिंदूंवर, तसेच शासनाच्या बसेस तथा सार्वजनिक मालमत्तेवर आक्रमणे करण्यात आली, तर श्रावणी सोमवारनिमित्त हरयाणातील नूंह (मेवात) येथे श्री महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी गेलेल्या हिंदू यात्रेकरूंवर एके-४७, पेट्रोल बाँब यांद्वारे आक्रमण करण्यात आले.
दंगलीच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – अधिवक्ता स्वप्नील गलधर
बीड – मागील काही मासांपासून एका मोठ्या षड्यंत्राद्वारे मणीपूर, देहली आणि मेवात (हरियाणा) येथे स्थानिक धर्मांध, तसेच राष्ट्रविरोधी लोक यांकडून स्थानिक हिंदूंना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिवक्ता स्वप्नील गलधर यांनी केले. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात बोलत होते.
या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. विपुल भोपळे, तसेच अधिवक्ता जगदीश जाजू, सर्वश्री प्रमोद खडकीकर, अशोक चव्हाण, सागर खळगे, रामेश्वर उदावंत, गणेश काळे, दत्ता माने यांच्यासह ग्रामीण आणि शहरी भागांतून मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते, तर १०० हून अधिक जणांनी निवेदनावर उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी केली. यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले.