१. श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिरात सेवेनिमित्त गेल्यावर सूक्ष्म दृश्य दिसणे; मात्र त्यापूर्वी बर्याचदा जाऊनही कोणतीही अनुभूती न येणे
‘३.६.२०२३ या दिवशी चित्रीकरणाच्या एका सेवेनिमित्त मी केरी, फोंडा (गोवा) येथील श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिरात गेले होते. याआधीही मी या मंदिरात ४ वेळा गेले होते. तेव्हा मला कोणतीही वेगळी अनुभूती आली नव्हती. या वेळी देवीचे दर्शन घेऊन तिला प्रार्थना करतांना मला एक सूक्ष्म दृश्य दिसले. ते माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते.
२. सेवेनिमित्त मंदिरात गेल्यावर सूक्ष्म दृश्यात काही काळापूर्वी श्री विजयादुर्गादेवीची उपासना करतांना देवी सगुण रूपात येऊन अपालाशी बोलत असल्याचे तिला दिसणे
‘मी काही काळापूर्वी श्री विजयादुर्गादेवीची उपासना करायचे. देवीच्या मंदिराच्या परिसरातच माझे लहानसे घर होते. मी प्रतिदिन रात्री देवीच्या या मंदिरात येऊन तिच्या चरणांशी बसून तिच्याशी बोलायचे. मी बोलत असतांना श्री विजयादुर्गादेवी मूर्तीतून सगुण रूपात प्रकट व्हायची आणि माझ्याशी बोलायची. तिला सगुणात आलेले पाहून माझा भाव जागृत व्हायचा. मी तिच्यासाठी खीर आणायचे आणि तिला भरवायचे. देवीही अतिशय आनंदाने ती खीर ग्रहण करायची. त्यानंतर मी तिच्यासाठी सोनचाफ्याच्या फुलांची माळ विणून आणायचे आणि तिला ती घालायचे.
३. सूक्ष्म दृश्यात देवीने नेसलेल्या साडीचा रंग स्थुलातील मूर्तीला नेसवलेल्या साडीच्या रंगाशी जुळणारा असणे
देवी माझ्याशी ‘ज्ञान आणि शक्ती’ या विषयांवर संवाद साधायची. (‘तो संवाद काय होता ?’, हे मला कळले नाही. – कु. अपाला) तेव्हा मला माझ्या डोक्यावर पांढरा प्रकाश दिसला.’ हेे दृश्य मला दिसले अन् मी स्थुलातून डोळे उघडून देवीकडे पाहिले. तेव्हा त्या दृश्यात तिने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते, त्याच रंगाचे, म्हणजे अष्टगंधाच्या रंगाचे वस्त्र देवीला नेसवले होते. हे पाहून मला आश्चर्य वाटले. (‘हे दृश्य या जन्मातील नव्हते’, असे मला जाणवले. – कु. अपाला) हे दृश्य दिसल्यानंतर माझा आनंद वाढला आणि मला हलके वाटले.
कृतज्ञता
परात्पर गुरुदेवांमुळेच हे सूक्ष्म दृश्य पाहून आनंद आणि हलकेपणाची अनुभूती घेता आली. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२२.६.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |