‘यशस्‍वी भव’ झालेला चंद्रयानाचा प्रवास !

‘विक्रम लँडर’ चंद्राच्‍या पृष्‍ठभागावर ‘सॉफ्‍ट लँडिंग’ करण्‍यासाठी सक्षम ! – ‘इस्रो’चे प्रमुख सोमनाथ

श्री. सोमनाथ

रशियाच्‍या चंद्र मोहिमेला मोठा धक्‍का बसला आहे. ‘लुना-२५’चे ‘लँडर’ हे चंद्रावर आपटले आहे. रशियाची ‘स्‍पेस एजन्‍सी रॉस्‍कॉस्‍मॉस’ने याविषयीची माहिती जगाला दिली. या पार्श्‍वभूमीवर ‘इस्रो’चे प्रमुख श्री. सोमनाथ यांनी अगोदरच सर्वांना आश्‍वस्‍त केले आहे. ते म्‍हणतात, ‘‘जरी सर्व काही अयशस्‍वी झाले. दोन्‍ही इंजिन आणि सर्व सेन्‍सर बंद झाले, कोणतीच गोष्‍ट काम करत नसली; तरीही ‘विक्रम लँडर’ चंद्राच्‍या पृष्‍ठभागावर ‘सॉफ्‍ट लँडिंग’ करण्‍यासाठी सक्षम आहे. अर्थात् यासाठी केवळ त्‍यातील ‘प्रॉपल्‍शन सिस्‍टीम’ कार्यरत असणे आवश्‍यक आहे.’’ ‘इस्रो’ने दिलेल्‍या माहितीनुसार २३ ऑगस्‍ट या दिवशी ‘चंद्रयान ३’ हे चंद्रावर सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी ‘सॉफ्‍ट लँडिंग’ केले आहे.

‘चंद्रयान ३’च्‍या प्रक्षेपणापासून अवतरणापर्यंतचे महत्त्वाचे टप्‍पे

आजपर्यंतच्‍या प्रवासात मात्र सर्व गोष्‍टी बिनचूक आणि गणिती अचूकतेने पार पडल्‍या आहेत. मग त्‍यामध्‍ये पृथ्‍वीभोवतीच्‍या चकरा असोत किंवा चंद्राच्‍या भोवतीच्‍या कक्षा कमी करणे असो, सारे काही ठरलेल्‍या वेळी आणि ठरलेल्‍या ठिकाणी घडले आहे. यानाची दिशा पालटणे, त्‍यासाठी त्‍यावरील विशिष्‍ट नोदके (थ्रस्‍टर) चालू आणि बंद करणे आणि तेही पृथ्‍वीवरील नियंत्रण कक्षातून काही लाख किलोमीटर अंतरावर हे फारच रोमांचकारी आहे. उदाहरणादाखल २२ जुलै या दिवशी ठरल्‍याप्रमाणे यानाला ७१,३५१ कि.मी. x २३३ कि.मी.च्‍या पृथ्‍वीभोवतीच्‍या कक्षेत प्रस्‍थापित केले गेले.

५ ऑगस्‍टला चंद्रासापेक्ष १६४ कि.मी. x १८,०७४ कि.मी.च्‍या कक्षेत यानाला पोचवण्‍यात आले. या ठिकाणी हे यान म्‍हणजे प्रणोदनयान आणि त्‍याच्‍या टोकावर बसवलेला विक्रम अवतरक होय. १७ ऑगस्‍ट या दिवशी ‘लँडर मॉड्यूल’ (विक्रम) ‘प्रोपल्‍शन (प्रणोदक) मॉड्यूल’पासून यशस्‍वीरित्‍या वेगळे केले आहे. चंद्राची काही मनोहारी छायाचित्रेही आता आपल्‍याला प्राप्‍त झाली आहेत. हा लेख लिहीत असतांना ‘विक्रम लँडर’ हा चंद्रापासून आकाशात २५ कि.मी. अंतरावरून प्रदक्षिणा करत होता. आता अवतरणाच्‍या प्रक्रियेसाठी ते सज्‍ज झाले आहे. ‘इस्रो’च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे २३ ऑगस्‍ट या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे दिव्‍य कार्य पूर्ण झाले.

‘विक्रम लँडर’ अवतरणाची प्रक्रिया

अवतरणाच्‍या प्रक्रियेसाठीचे प्रत्‍यक्ष निर्णय ‘विक्रम लँडर’लाच घ्‍यावे लागले आहेत. यामध्‍ये ठराविक उंचीवर आल्‍यावर चंद्र त्‍याला ओढू लागेल, तेव्‍हा पृष्‍ठभागापासून आपले अंतर किती आहे ? याचा अंदाज त्‍याच्‍यावरील छायाचित्रक (कॅमेरा) आणि ‘सेन्‍सर’ वापरून ते घेईल. चंद्रावर अलगद उतरण्‍यासाठी त्‍याला विरुद्ध दिशेने बळ लावावे लागेल, यासाठी नोदक चालू आणि बंदही करावे लागतील अन् हे काही सेकंदाच्‍या अवधीत करावे लागेल अगदी स्‍वनियंत्रित पद्धतीने ! ‘विक्रम लँडर’ला उतरतांना सरळ दिशेत उतरावे लागेल, कलंडून अथवा आपटून चालणार नाही; म्‍हणूनच याला ‘सॉफ्‍ट लँडींग’ (हळूवार अवतरण) म्‍हटले आहे. हे यशस्‍वी करण्‍यासाठीच सर्व अट्टहास आहे. या अवतरणासाठी लागणारे ‘प्राथमिक प्रतिउत्तेजन’ (डिबूस्‍टिंग) १८ ऑगस्‍ट या दिवशी झाले आहेच. दुसरेही २० ऑगस्‍ट या दिवशी झाले आहे. यामुळे यानाची गती न्‍यून होऊन ते चंद्राच्‍या पृष्‍ठभागाजवळ नियोजित अंतरावर पोचेल. या वेळी त्‍याची कक्षा ११३ कि.मी. x १५७ कि.मी. इतकी न्‍यून करण्‍यात आली होती. आता ती साधारण ३० कि.मी. x १०० कि.मी. आहे.

– प्रा. बाबासाहेब सुतार, साहाय्‍यक प्राध्‍यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी


१. ‘चंद्रयान-३’ चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवावर पाठवण्‍यामागील कारणमीमांसा

प्रा. बाबासाहेब सुतार

देशाच्‍या दृष्‍टीने ‘चंद्रयान ३’ हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे. यामुळे चंद्रावर हळूवार (सॉफ्‍ट लँडिंग) अवतरण करणारे अमेरिका, रशिया आणि चीन यांच्‍यानंतर भारत हे चौथे राष्‍ट्र असणार आहे. वर्ष २०१९ मध्‍ये ‘चंद्रयान २’ मोहीम थोडीशी अयशस्‍वी झाल्‍यानंतर भारताची ही दुसरी मोहीम आहे. ‘चंद्रयान ३’ मोहिमेचे यश भारतासाठी एक मोठा विजय आहे; कारण चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारी ही जगभरातील पहिलीच मोहीम असेल. चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवाविषयी अजूनही फार माहिती उपलब्‍ध नाही. तेथे सावलीत असणार्‍या चंद्राच्‍या पृष्‍ठभागाचे क्षेत्र चंद्राच्‍या उत्तर ध्रुवापेक्षा पुष्‍कळ मोठे आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, कायमस्‍वरूपी सावली असलेल्‍या भागात पाणी असण्‍याची शक्‍यता आहे.  ‘चंद्रयान १’ ने वर्ष २००८ मध्‍ये दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रावर पहिले पाणी शोधले होते. त्‍यामुळेच ‘आम्‍हाला या ठिकाणी अधिक वैज्ञानिक स्‍वारस्‍य आहे; कारण महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोध लावायचे असतील, तर दक्षिण ध्रुवासारख्‍या नवीन भागातच जावे लागेल. लँडिंगसाठी सुरक्षित असलेल्‍या विषुववृत्तीय प्रदेशावर इतर राष्‍ट्रे अगोदर पोचली आहेतच आणि त्‍या ठिकाणची भरपूर माहितीही (‘डेटा’ही) उपलब्‍ध आहे. त्‍यामुळेच या मोहिमेविषयी जगातील इतर देशांनीही स्‍वारस्‍य दाखवले आहे’, असे ‘इस्रो’चे प्रमुख श्री. सोमनाथ यांनी म्‍हटले आहे. दुसरे असे की चंद्राच्‍या विषुववृत्तीय प्रदेशापेक्षा दक्षिण ध्रुवावर अवतरण करणे, हे तुलनेने जोखमीचे आहे. कोणतीही अंतर्ग्रहीय अथवा चंद्र मोहीम, म्‍हणजे एखाद्या देशासाठी भविष्‍यातील अवकाश मोहिमांचे प्रवेशद्वारच असते. साहजिकच भारतवर्षासाठी ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे.

२. ‘विक्रम लँडर’ने (विक्रम अवतरकाने) चंद्रपृष्‍ठावर उतरणे

बालपणापासून प्रत्‍येकाच्‍या भावविश्‍वावर राज्‍य करणारा चंद्र आपल्‍या पृथ्‍वीपासून ३ लाख ८४ सहस्र किलोमीटरवर आहे. चंद्रयान तिथे पोचण्‍यासाठी सुमारे ४० दिवसांचा प्रवास केला आहे. ‘१४ जुलै या दिवशी प्रक्षेपित झालेले चंद्रयान-३ आता २३ ऑगस्‍ट या दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी चंद्राजवळ पोचेल आणि चंद्रयानातील ‘विक्रम लँडर’ (अवतरक) चंद्रपृष्‍ठाला स्‍पर्श करील’, असे ‘इस्रो’चे म्‍हणणे आहे. या ‘विक्रम अवतरका’ने पोटातून वाहून आणलेला ‘प्रज्ञान रोव्‍हर’ म्‍हणजेच चंद्रबग्‍गी चंद्राशी हितगुज करील आणि खर्‍या अर्थाने ही मोहीम यशस्‍वी होईल. हा लेख आपल्‍या हातात येईल, तेव्‍हा भारत देश चैतन्‍याने रसरसलेल्‍या उत्‍सुकपूर्ण वातावरणाने भारलेला असेल.

३. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थे’चे कार्य

१४ जुलैच्‍या दुपारी चालू झालेल्‍या या प्रवासाची आपण थोडक्‍यात माहिती घेऊ. अगदी शालेय स्‍तरावरील विज्ञान आणि गणित यांच्‍या नियमांच्‍या आधारे चंद्रयान प्रवास केला आहे; परंतु यामागे असणारे तंत्रज्ञान फारच उच्‍च स्‍तरावरील आहे. देशभरात विखुरलेल्‍या ‘इस्रो’च्‍या २१ संस्‍थांचे योगदान या मोहिमेमध्‍ये आहे. एक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्‍यासाठी या संस्‍थांपैकी एक संस्‍था उपग्रहाचा आराखडा बनवते, दुसरी प्रत्‍यक्ष उपग्रह निर्मिती करते, तर काही संस्‍था रॉकेटचा आराखडा, त्‍याची जुळणी, त्‍यासाठी लागणारे इंधन, ते प्रक्षेपणस्‍थळी वाहून नेणे, ठराविक वेळी प्रक्षेपण करणे आणि नंतर त्‍याचे नियंत्रण करणे या गोष्‍टी करतात. अर्थात् या सर्वांचे नेतृत्‍व ‘इस्रो’चे प्रमुख करतात. अशा एका मोहिमेमागे असे सहस्रो हात आणि मने काम करत असतात. तसेच कोट्यवधी भारतियांचे मनही या उपक्रमात गुंतलेले असते. प्रक्षेपणापासून प्रत्‍यक्ष चंद्रभूमीवर भ्रमणयान उतरवण्‍याचा हा प्रवास अतिशय रोमांचकारी आणि कुतूहलाने भारलेला असतो.

४. चंद्रयानाच्‍या प्रवासाचे ३ टप्‍पे

अ. पहिल्‍या टप्‍प्‍याला ‘पृथ्‍वीकेंद्रित टप्‍पा’ असेही म्‍हणतात. यामध्‍ये यान-प्रक्षेपणपूर्व चाचण्‍या घेणे, प्रत्‍यक्ष प्रक्षेपित करणे, प्रारंभी पृथ्‍वीभोवतीच्‍या कक्षेत प्रस्‍थापित करणे या मुख्‍य गोष्‍टी असतात.

आ. दुसरा टप्‍पा म्‍हणजे चंद्राकडील प्रवासासाठी यानाला चंद्राच्‍या दिशेने प्रक्षेपित करणे.

इ. तिसरा टप्‍पा अतिशय कौशल्‍याचा आणि जोखमीचा आहे. चंद्रयान अगोदर पृथ्‍वीसापेक्ष लंबवर्तुळाकार कक्षेत फिरवणे आणि ही कक्षा वाढवत नेत एका ठरलेल्‍या वेळी चंद्राच्‍या दिशेने त्‍याला नेणे. ही पहिली प्रक्रिया तर चंद्राभोवतीच्‍या कक्षेत मात्र उलटी प्रक्रिया आहे. चंद्राभोवतीची आरंभीची लंबवर्तुळाकार कक्षा कमी कमी करत शेवटी वर्तुळाकार कक्षेत यान फिरत ठेवत आणि त्‍याची गती हळूहळू कमी करत अवतरणासाठी लागणार्‍या स्‍थितीला आणणे, एका ठराविक वेळी ‘प्रणोदक (प्रोपल्‍जन)’ यानापासून ‘विक्रम लँडर’ वेगळे करणे आणि शेवटी चंद्रभूमीवर लँडरचे हळूवार अवतरण करणे, हा श्‍वास रोखून ठेवणारा प्रसंग म्‍हणता येईल, असा टप्‍पा होय. ‘विक्रम’ सुरक्षितपणे उतरल्‍यावर त्‍यातून चंद्रावर फिरणारी बग्‍गी (भ्रमणयान) बाहेर येणे आणि चंद्रपृष्‍ठावर तिने नेमून दिलेले काम करणे, म्‍हणजेच चंद्रयान मोहीम यशस्‍वी होणे होय.

हा सगळा घटनाक्रम घडणार आहे, तो १४ जुलै ते २३ ऑगस्‍ट या कालावधीत ! सध्‍या तिसर्‍या टप्‍प्‍यात १७ ऑगस्‍ट या दिवशी ‘लँडर मॉड्यूल (विक्रम)’ ‘प्रोपल्‍शन (प्रणोदक) मॉड्यूल’पासून यशस्‍वीरित्‍या वेगळे केले गेले आहे.

५. ‘चंद्रयान ३’विषयी ‘इस्रो’चे प्रमुख, पंतप्रधान मोदी अन् ‘चंद्रयान १’चे प्रकल्‍प यांनी दिलेला संदेश

अ. १४ जुलै या दिवशी प्रक्षेपणाच्‍या वेळी ‘चंद्रयान ३’ ने चंद्राच्‍या दिशेने प्रवास चालू केला आहे’, असे ‘इस्रो’चे प्रमुख श्रीधर पणिकर सोमनाथ यांनी चंद्रयानाच्‍या यशस्‍वी उड्डाणानंतरच्‍या पहिल्‍या संदेशमध्‍ये सांगितले. या वेळी ‘इस्रो’ने ट्‍वीट केले, ‘‘आमच्‍या प्रक्षेपण वाहनाने चंद्रयान पृथ्‍वीभोवती अचूक कक्षेत ठेवले आहे. अंतराळ यानाची प्रकृती सामान्‍य आहे.’’

आ. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले, ‘‘चंद्रयान ३ ने भारताच्‍या अंतराळ युगामध्‍ये आणखी एक नवीन अध्‍याय लिहिला आहे.’’

इ. ‘‘चंद्रयान ३’ ही भारताच्‍या चंद्र संशोधन कार्यक्रमातील तिसरी मोहीम आहे आणि या मोहिमेला पूर्वीच्‍या चंद्र मोहिमांच्‍या यशातील अभ्‍यासाचा भक्‍कम अनुभव आहे. वर्ष २००८ मध्‍ये पहिली चंद्र मोहीम झाली आणि देशातील ‘चंद्राच्‍या पृष्‍ठभागावर पाण्‍याचा पहिला आणि सर्वांत तपशीलवार शोध घेतला आहे’’, असे ‘चंद्रयान १’चे प्रकल्‍प संचालक श्री. अण्‍णादुराई म्‍हणाले होते.

‘‘चंद्रयान २’ ज्‍यामध्‍ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्‍हरचाही समावेश होता. हे यान जुलै २०१९ मध्‍ये प्रक्षेपित केले गेले; परंतु ते केवळ अंशतः यशस्‍वी झाले. त्‍याचे ऑर्बिटर आजही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे आणि त्‍याचा अभ्‍यास करत आहे; परंतु लँडर-रोव्‍हर हळूवार लँडिंग करण्‍यात अयशस्‍वी ठरला. ‘ब्रेकिंग सिस्‍टीम’मधील शेवटच्‍या क्षणी बिघाडामुळे हे अपयश आले’’, असेही श्री. अण्‍णादुराई यांनी स्‍पष्‍ट केले होते.

सध्‍याचे ‘इस्रो’चे प्रमुख श्री. सोमनाथ यांचे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी पूर्वीच्‍या मोहिमेतील शेवटच्‍या अवतरण माहितीचा काळजीपूर्वक अभ्‍यास केला आहे आणि त्रुटी दूर करण्‍यासाठी आधुनिक ‘सिम्‍युलेशन’ तंत्राद्वारे अभ्‍यास केला आहे.

६. ‘इस्रो’ची कामगिरी अभिमानास्‍पद !

अनेकदा जनमनसात अवकाश मोहिमा, म्‍हणजे खर्चिक, देशाला न परवडणार्‍या असा समज असतो; परंतु या मोहिमांमधून शोध लागलेले नवनवीन तंत्रज्ञान आणि विज्ञान याचा कालांतराने दैनंदिन व्‍यवहारातील सुगमतेसाठी होतो. उदाहरणार्थ आजचा भ्रमणभाष संच ही अवकाश संशोधनाचीच देणगी आहे. जरी भारताच्‍या पुढे अनेक प्रश्‍न असले, तरी यापूर्वी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरल्‍यामुळेच अन्‍नदुर्भिक्ष्य, आरोग्‍य सुधारणा इत्‍यादी क्षेत्रात भारत अग्रगण्‍य आहे. त्‍यामुळे वाढती लोकसंख्‍या आणि आधुनिक शिक्षण यांसाठी विज्ञान तंत्रज्ञानातील गुंतवणूक भारताला पुढे नेईल. ‘इस्रो’ स्‍वतःचे योगदान तिच्‍या स्‍थापनेपासून म्‍हणजेच १५ ऑगस्‍ट १९६९ पासून देत आहे. इतर मोठी राष्‍ट्रे चंद्रावर समानव मोहिमा काढत होते, तेव्‍हा आपल्‍या अवकाश कार्यक्रमांना प्रारंभ झाला होता. त्‍या तुलनेने गेल्‍या जवळपास अर्धशतकाहून अधिक कालखंडात ‘इस्रो’ने केलेली प्रगती निश्‍चितच कौतुकास्‍पद आणि अभिमानास्‍पद आहे.

– प्रा. बाबासाहेब सुतार, साहाय्‍यक प्राध्‍यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी

‘चंद्रयान ३’साठी ‘इस्रो’ने वापरलेले कौशल्‍यपूर्ण तंत्र !

सुमारे ३ सहस्र ९०० किलोग्रॅम वजनाच्‍या ‘चंद्रयान ३’ने १ सहस्र ५०० किलोग्रॅम वजनाचा ‘लँडर’ (विक्रम) आणि २६ किलोग्रॅम वजनाचे ‘प्रज्ञान’ नावाचे ‘रोव्‍हर’ त्‍याच्‍या पोटातून वाहून नेले आहे. प्रक्षेपकाची उंची सुमारे ४५ मीटर आणि इंधनसहित त्‍याचे वजन ६४२ टन इतके आहे. हे महाकाय रॉकेट पहिल्‍या सुमारे २ मिनिटे ५ सेकंदात (१२५ सेकंद) स्‍वतःचा इंधनासहित सर्व भार उचलत आणि काही भागांचा त्‍याग करत १ सहस्रव्‍या सेकंदाला १८० किलोमीटर उंचीवर चंद्रयानाला अवकाशात पोचवून स्‍वतःचा कार्यभार उरकते.

या प्रक्षेपणानंतर यानाला चंद्राच्‍या कक्षेत प्रवेश करण्‍यासाठी अनुमाने १५ दिवस लागले. या सगळ्‍यात प्रचंड अशी गणिती अचूकता आहे. दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान घिरट्या घालते, तसेच पृथ्‍वी आणि चंद्र यांच्‍याही गुरुत्‍वाकर्षणाचा उपयोग करून घेते, ही कसोटीस पात्र ठरलेली प्रक्रिया भारत वापरत आहे. त्‍यामुळे यानावर नियंत्रण तर रहातेच आणि इंधनही अल्‍प लागते. गेल्‍या अनेक मोहिमांसाठी आपण हेच तंत्र वापरले आहे.

जर सर्व काही योजनेप्रमाणे झाले, तर सहाचाकी ‘प्रज्ञान रोव्‍हर’ नंतर बाहेर पडेल आणि चंद्राच्‍या पृष्‍ठभागावरील खडक अन् विवरांभोवती फिरेल, महत्त्वपूर्ण माहिती, तसेच छायाचित्र एकत्रित करील आणि विश्‍लेषणासाठी पृथ्‍वीवर परत पाठवेल. हे साधण्‍यासाठीच फार कौशल्‍य लागणार आहे.

२३ ऑगस्‍ट हा दिवस निवडण्‍यामागील कारण

काही जिज्ञासू मंडळींना हा प्रश्‍न पडला असेल की, २३ ऑगस्‍टच का ? प्राथमिक खगोलशास्‍त्र आपल्‍याला सांगते की, चंद्राला स्‍वत:भोवती फिरण्‍यास लागणारा वेळ आणि पृथ्‍वीभोवती प्रदक्षिणा करण्‍यास लागणारा वेळ सारखाच असतो. तो साधारण २८ दिवसांचा असतो. साहजिकच १४ दिवस चंद्राचा सूर्यप्रकाशात असलेला पृष्‍ठभाग आपल्‍याला पृथ्‍वीवरून दिसतो. याच काळात ‘प्रज्ञान रोव्‍हर’ चंद्राचे निरीक्षण करील. त्‍यावरील ‘सोलर पॅनल’ सूर्यप्रकाशातच काम करतील. पृथ्‍वीसापेक्ष चंद्राचे स्‍थानही जवळ असेल. त्‍यामुळे २३ ऑगस्‍ट ही वेळ ‘इस्रो’ने निवडली आहे. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर अवकाश मोहिमा आखतांना सारेच देश एकमेकांना साहाय्‍य करतात. ‘चंद्रयान ३’साठीही आपण असेच साहाय्‍य घेत आहोत.

‘इस्रो’चे शास्‍त्रज्ञ मनीष पुरोहित यांनी म्‍हटले आहे की, ‘चंद्रयान मिशन’मुळे भारताकडे चंद्रावर ‘सॉफ्‍ट लँडिंग’ करण्‍याची आणि त्‍या ठिकाणी ‘रोव्‍हर’ चालवण्‍याची क्षमता आहे, हे जगासमोर सिद्ध करू शकतो. आपल्‍या ज्ञानात यामुळे भर तर पडेलच; पण जगातील इतर राष्‍ट्रेही अशा मोहिमांसाठी भारताचे सहकार्य घेऊ शकतील. यामुळे भारतातील विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित व्‍यवसायांमध्‍ये वाढ होण्‍यासाठी साहाय्‍य होईल. भारताने चंद्र मोहिमेसाठी ‘एल्.व्‍ही.एम्. ३’ हे शक्‍तीशाली रॉकेट वापरल्‍यामुळे भविष्‍यातील मोहिमांसाठी भारत हे एक आता आशास्‍थान निर्माण झाले आहे.