ज्योतिषशास्त्रानुसार ‘चंद्र’ हा तसा मानवी मनाचा कारक ! ‘याच चंद्रावर भारताचे ‘चंद्रयान-३’ यशस्वीरित्या उतरेल का ?’, या प्रतीक्षेत १४० कोटी ‘मने’ लागली होती. अर्थात् भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या, म्हणजेच ‘इस्रो’च्या प्रतिभावान वैज्ञानिकांची तपश्चर्या आणि कोट्यवधी भारतियांच्या प्रार्थना, होमहवनादी अनुष्ठान फळाला आले अन् भारतीय मोहीम अंतत: यशस्वी झाली ! चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवण्यामध्ये भारत हा तत्कालीन सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर चौथाच देश ठरला, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम पाय रोवण्याचा बहुमान भारताला मिळाला आहे.
पराक्रम वैशिष्ट्यपूर्णच !
भारताने गाजवलेला हा पराक्रम अनेक अर्थाने विशेष आहे. ‘चंद्रयान-३’चा भारताला आलेला एकूण खर्च ६१५ कोटी रुपये म्हणजे ७४ दशलक्ष अमेरिकी डॉलर ‘इतकाच’ होता. हा खर्च किती अल्प आहे, हे आपल्याला हॉलीवूडच्या २ चित्रपटांचा अभ्यास केल्यास लक्षात येईल. ‘ग्रॅव्हिटी’ या गुरुत्वाकर्षणाचे महत्त्व सांगून अंतराळातील चित्तथरारक अनुभवावर आधारित वर्ष २०१३ मधील चित्रपटाला ६४४ कोटी रुपये खर्च आला होता. ‘भविष्यात पृथ्वी मानवासाठी रहायला लायक रहाणार नाही, यासाठी अन्य ग्रहांच्या शोधात निघालेल्या मानवाला विविध ग्रहांवर आलेल्या विचित्र अनुभवांवर, विशेषकरून आईन्स्टाईनच्या ‘सापेक्षतावादाच्या सिद्धांता’वर आधारित वर्ष २०१४ मधील ‘इंटरस्टेलार’ या चित्रपटासाठी तर प्रसिद्ध चित्रपट निर्माते ख्रिस्तोफर नोलान यांना तब्बल १ सहस्र ३७० कोटी रुपये खर्च करावे लागले. ही रक्कम ‘चंद्रयान-३’च्या खर्चापेक्षा दुपटीहूनही अधिक आहे. या दोन्ही ‘सायन्स फिक्शन मूव्हीज’ म्हणजेच वैज्ञानिक सिद्धांतांच्या आधारे रचलेल्या कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे चित्रण करणारे चित्रपटच ! भारताची ही यथार्थ मोहीम होय. यातच भारतीय वैज्ञानिकांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते !
राष्ट्रीय अत्यानंदाच्या या क्षणी आम्हा भारतियांना हिणवणार्यांना आम्ही विसरू शकत नाही. दशकभरापूर्वीची ही घटना ! भारताने मंगळाच्या दिशेने ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ प्रक्षेपित केल्यावरून भारतद्वेष भिनलेल्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले. त्यात ‘एका कार्यालयात अंतराळ संशोधनात अग्रेसर असलेल्या देशांचे प्रतिनिधी बसल्याचे दाखवले होते आणि बाहेर एक भारतीय शेतकरी त्याच्या गायीसोबत दिसत होता. तो दरवाजा उघडून आत येण्यासाठी अनुमती घेत आहे’, अशा प्रकारे भारताला अवमानित करणारे हे व्यंगचित्र होते. अर्थात् ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला यावरून क्षमा मागण्यास आपण भाग पाडले आणि ३ वर्षांनी मंगळावरील मोहीम यशस्वी करून या दैनिकासह संपूर्ण पश्चिमी जगाला तोंडात बोटे घालायला लावली. आजही भारताने तसाच पराक्रम गाजवत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला. असो.
‘चंद्रयान-३’च्या या यशस्वीतेमुळे आता संशोधनाची अनेक दालने उघडली आहेत. आता ‘विक्रम लँडर’मधून ‘प्रज्ञान रोव्हर’ उतरून तो चंद्रावरील बर्फ, पाणी, प्राणवायू, खनिज पदार्थ यांचा अभ्यास करणार आहे. अमेरिका आणि चीन यांना भविष्यात चंद्रावर मानवसहित याने पाठवायची आहेत. यांसाठी भारताने केलेल्या संशोधनाचा पुष्कळ लाभ होणार आहे. यातून पाश्चात्त्यांच्या भविष्यातील संभाव्य मानवी वसाहतीचा मार्गही सुकर होईल. यामागील त्यांचा उद्देश अर्थातच भारतीय तत्त्वज्ञानाच्या पूर्णत: विपरीत आहे. पश्चिमी बुद्धी ही ‘निसर्ग मानवासाठी असून त्याला ओरबाडायचे कसे’, यासाठीच खर्चिली जाते, तर भारतीय ज्ञानपरंपरा निसर्गाकडे कृतज्ञतेने पाहून नि विवेक जागृत ठेवून मानवहितार्थ कार्य करते. त्यामुळे पृथ्वीची साधनसंपत्ती नष्ट करून चंद्रावर घाला घालण्याचा विचार ‘इस्रो’ आणि भारत कधीच करणार नाही !
सर्वसाधारण भारतियांना लाभच !
‘चंद्रयान-३’ने घवघवीत यश मिळवले, त्यामागे देशभरातील ‘इस्रो’च्या २१ संस्थांचे योगदान आहे. ‘इस्रो’चे प्रमुख श्रीधर पणिकर सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली या सर्व संस्थांनी नवा अध्याय लिहिला; परंतु काही लोकांकडून ‘चंद्रावर पोचण्याचा भारतासारख्या दरिद्री देशाने एवढा आटापिटा का करावा’, असा प्रश्न उपस्थित केला. याचे उत्तर एवढेच की, गेल्या ७० वर्षांत विविध देशांनी एकूण १११ चंद्रमोहिमा राबवल्या. त्यांतील केवळ ८ मोहिमांनाच काही प्रमाणात यश आले. अशा अनेक अंतराळ मोहिमा झाल्या. त्यांचा सर्वसाधारण मानवी जीवनाला पुष्कळ लाभ झाला आहे आणि असाच लाभ ‘चंद्रयान-३’मुळे भारतियांनाही होणार आहे. ‘खगोल भौतिकशास्त्रा’ची जटिलता; अभियांत्रिकी, पदार्थविज्ञान आदी विविध शास्त्रांतील अत्यंत कठीण समीकरणे, सिद्धांत यांच्या आधारे जे तंत्रज्ञान अंतराळ यानांसाठी विकसित केले जाते, त्याचा वापर ‘व्हॅक्यूम क्लीनर’सारख्या दैनंदिन वापरातील वस्तू, तसेच विमानाचे उड्डाण नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे अचूक तंत्रज्ञान, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘पंप’, छायाचित्रकांमध्ये वापरण्यात येणारे ‘सेन्सर्स’, एवढेच नव्हे, तर इंटरनेट आणि ‘जीपीएस्’ तंत्रज्ञान यांचा उगमही याच अंतराळ तंत्रज्ञानाच्या विकासातून झाला आहे. दुसरे असे की, भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या यशाचे दूरगामी परिणाम हे भारताचा जगामध्ये मान वाढवणारे ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, व्यापार, अर्थव्यवस्था यांवर पुष्कळ सकारात्मक पालट आपसूकच पहायला मिळणार आहेत.
अमेरिका आणि अन्य काही देश ज्या प्रकारे अंतराळ मोहिमांचे खासगीकरण करून त्याचा विकास करू पहात आहेत, तसाच प्रयत्न आता ‘इस्रो’नेही हाती घेतला आहे. केंद्रशासनाने ‘इन-स्पेस’ या आस्थापनाची निर्मिती करून त्याद्वारे खासगी आस्थापनांनाही या कार्याशी जोडण्यास आरंभले आहे. ‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेमुळे आता या कार्यक्रमाला अधिक चालना मिळणार आहे. तशीच चालना अंतराळ विज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी, तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठीही मिळणार आहे. त्यामुळे ‘विक्रम लँडर’ने केलेला विक्रम सर्वसाधारण भारतियासाठी भूषणावहच आहे.
‘चंद्रयान-३’ने प्रस्थापित केलेल्या ‘विक्रम’ने जगाला पुन्हा एकदा दाखवून दिली भारतीय बुद्धीमत्तेची चुणूक ! |