केंद्रशासनाच्या ‘माझी माती, माझा देश’ या देशव्यापी अभियानांतर्गत मंगळुरू (कर्नाटक) येथे विरांचा सन्मान
मंगळुरू (कर्नाटक) – देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेले हुतात्मे आणि वीर सैनिक यांच्या स्मरणार्थ अन् स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रशासनाच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ हे देशव्यापी अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत मंगळुरू येथील महानगरपालिकेमध्ये ‘वीरयोद्ध्यांना वंदन’ हा कार्यक्रम १९ ऑगस्ट या दिवशी पार पडला. यात मुख्यतः स्वातंत्र्ययोद्धे, हुतात्मा सैनिक आणि हुतात्मा झालेल्या पोलीस कर्मचार्यांचे कुटुंबीय अशा ११ जणांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात सनातनच्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचे दिवंगत पती आणि स्वातंत्र्ययोद्धे बि. दामोदर प्रभु यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात कॅप्टन गणेश कर्णिक (निवृत्त) यांच्या हस्ते पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना शाल, भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर जयानंद अंचन हे उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्ययोद्धे मट्टारू विठ्ठल किणी (वय ९६ वर्षे) यांचाही सन्मान करण्यात आला.
दिवंगत बि. दामोदर प्रभु यांचा परिचयदिवंगत बि. दामोदर प्रभु यांचा जन्म ५.१०.१९२५ या दिवशी झाला होता. वयाच्या १७ व्या वर्षी ते देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. इंग्रजांच्या विरोधात चालू केलेल्या ‘चले जाव’ अभियानात त्यांनी सहभाग घेतल्याने त्यांना बळ्ळारी येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन केंद्रशासनाने बि. दामोदर यांचा ‘ताम्रपत्र’ देऊन सन्मान करण्याचे ठरवले होते; परंतु त्यांनी तो विनम्रपणे नाकारत ‘देशाला मिळालेले स्वातंत्र्य हाच माझा आनंद आहे’, असे सांगत त्यांनी ते ताम्रपत्र देशालाच अर्पण केले. |