पुणे येथील शिल्पकाराने लाकडाचा बारीक भुसा वापरून सिद्ध केली अशास्त्रीय श्री गणेशमूर्ती !

पुणे – भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा, गाळाची माती, शाडू माती वापरून शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे. या मिश्रणासाठी त्यांना ‘पेटंट’ही मिळाले आहे. अशा पद्धतीचे पेटंट मिळवणारे ते पहिलेच शिल्पकार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे. त्यामुळे त्यांना ‘रवींद्र मिश्रण’ या नावाने पेटंट मिळाले आहे. या मिश्रणाची माहिती धोंडफळे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

धोंडफळे यांनी सांगितले की, आजोबांनी केलेली पांगुळ अळीची श्री गणपति मूर्ती, कागदी लगद्यापासून वर्ष १९५५ मध्ये केलेली मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वडील रवींद्र यांच्याही पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या अनेक गणेशमूर्ती पुण्यात आणि पुण्याबाहेर गेल्या आहेत. (कागदाची मूर्ती म्हणजे ‘इकोफ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) मूर्ती असा प्रचार काहींनी चालू केला आहे. कागदाचा लगदा पाण्यातील प्राणवायू शोषून घेतो आणि त्यातून जीवसृष्टीला हानीकारक अशा मिथेन वायूची निर्मिती होते. त्यामुळे अशा मूर्ती अशास्त्रीय, तसेच पर्यावरणालाही हानीकारक आहेत. – संपादक) यातूनच प्रेरणा घेत मी एका नवीन मिश्रणाच्या अभ्यासास आरंभ केला. या मिश्रणावर अनेक प्रयोग केले गेले. शाडूची मूर्ती वजनाला जड असते, तर पीओपीच्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया केली असल्याने त्यांचे विसर्जन होणे सहज शक्य नसते. (वजनाला जड असली, तरी शाडू मातीची मूर्ती पाण्यात पूर्णपणे विसर्जित होते आणि त्यापासून पर्यावरणाला कोणतीही हानी पोचत नाही. – संपादक) मात्र ‘रवींद्र मिश्रणा’पासून सिद्ध केलेली ‘गणेशमूर्ती’ खर्‍या अर्थाने पर्यावरणपूरक आहे, असा दावा त्यांनी केला आहे.