सिडको घरे बांधून देणार
रायगड – इर्शाळवाडी येथील भीषण दुर्घटनेनंतर ४४ अपघातग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी सुचवलेल्या २.६ हेक्टर जागेची निवड करण्यात आली आहे. या जागेवर पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजन विभागाने ८ दिवसांत आराखडा सिद्ध करून तो रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे सादर केला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने सादर केलेल्या पुनर्वसन विकास आराखड्यात दरड दुर्घटनेतील नागरिकांसाठी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे एकूण ४४ रहिवासी वापराच्या भूखंड, सपाट पातळीवर प्रस्तावित करण्यात आले आहेत. ही जागा काही प्रमाणात भूमीपासून उंचावर असल्यामुळे भविष्यात कुठलाही धोका टाळण्यासाठी जागेच्या सर्व बाजूंस संरक्षण भिंत प्रस्तावित करण्यात आली आहे.
यात प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळण्यासाठी खुली जागा, प्राथमिक आरोग्यकेंद्र आदी सुविधांसाठी भूखंडाचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आपद़्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी खाली असलेल्या नानिवली गावामधून दोन प्रवेश मार्गांचे पर्याय सुचवण्यात आले आहेत. आता या आपद़्ग्रस्तांना घरे बांधून देण्याचे दायित्व सिडकोवर आहे.