केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण !
पुणे, १२ ऑगस्ट (वार्ता.) – ‘चांदणी चौका’तील वाहतूक समस्या या उड्डाणपुलामुळे संपून जाईल. पुण्यात लोकसंख्येसह वाहनांची संख्या वाढत आहे. आता पुणे प्रदूषणमुक्त करण्यावर भर दिला पाहिजे. पुण्याला मोकळा श्वास घेता येऊ दे. त्यासाठी इथेनॉल, इलेक्ट्र्रिक, मिथेनॉल, एल्.एन्.जी., बायो सी.एन्.जी. यांवर भर दिला पाहिजे. पुण्याच्या बाहेरील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा आराखडा सिद्ध होत आहे. त्याला निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच खासदार, आमदार, अधिकारी वर्ग उपस्थित होता.
मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘आपण सहस्रो कोटी रुपयांचे उड्डाणपूल, रस्ते करू शकतो; परंतु भूमी अधिग्रहणासाठी पैसे देऊ शकत नाही.’’ त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नगरोत्थान’ योजना आखून पुणे, सोलापूर, नागपूर येथील भूमी अधिग्रहणासाठी लागणारे पैसे राज्य सरकार देईल, असे सांगून अडलेली कामे मार्गस्थ लावली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पुणे हे बुद्धीवंतांचे शहर आहे. त्यामुळे नाव देतांना दमछाक होते. ‘महामेट्रो’ने ‘एक पुणे’ हे स्मार्ट कार्ड चालू केले आहे. हे कार्ड देशातील सर्वच मेट्रोमध्ये चालेल. पुरंदर विमानतळाच्या केंद्राने सर्व मान्यता दिलेल्या आहेत. आता भूमींचे अधिग्रहण लवकरच होईल. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटी रुपये दिले आहेत.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘या पुलासाठी सर्वांनीच पाठपुरावा केला आहे. चांदणी चौक हा पुण्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आलेल्या सर्व अडचणींतून गडकरी यांनी मार्ग काढला. अडचणी सोडवल्या. पैशाची कमतरता पडू दिली नाही. ‘नेता असावा, तर नितीन गडकरींसारखा !’’, अशा शब्दांमध्ये त्यांनी कौतुक केले.
पुलाला नाव देण्यावरून वाद निर्माण होत आहेत. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे’, अशी शिवसेनेची मागणी आहे, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे’, असा आग्रह संभाजी बिग्रेडने केला आहे.