सहा वर्षे संमतीने संबंध ठेवल्यानंतर महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू – सहा वर्षे एखाद्याशी सहमतीने संबंध ठेवल्यानंतर महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्या एका निकालात म्हटले आहे. न्यायमूर्ती एम्. नाजप्रसन्ना यांनी याचिकाकर्त्याच्या विरोधात वर्ष २०२१ मध्ये बेंगळुरूमध्ये महिला पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या संदर्भातील कार्यवाही रहित केली. पहिल्या दिवसापासून त्यांच्यात (याचिकादार आणि तक्रारदार) सहमतीने शारीरिक संबंध चालू झाले आणि ते ६ वर्षे टिकले. त्यामुळे याला भारतीय दंड संहितेच्या ३७६ कलमानुसार बलात्कार मानला जाऊ शकत नाही, असे न्यायाधिशांनी आपल्या निकालात म्हटले आहे.

पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार याचिकाकर्त्याने तक्रारदाराशी वर्ष २०१३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली होती. सुमारे ६ वर्षे दोघांमध्ये शारीरिक संबंध चालू होते. ८ मार्च २०२१मध्ये तक्रारदाराने याचिकाकर्त्याच्या विरोधात पोलिसांत फसवणूक आणि धमकी दिल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चालू केलेल्या कार्यवाहीला याचिकाकर्त्याने न्यायालयात आव्हान दिले होते.