मुंबई येथील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई, ५ ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई येथील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये रहाणार्‍या रहिवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणार्‍या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत दिली.

मुंबई येथील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषदेच्या सदस्यांनी मांडलेल्या भावनांचा सकारात्मक विचार केला जाईल. सध्या चालू असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अधिवेशनानंतर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाकडील निधीचा आढावा घेतला जाईल. या मंडळाकडे निधी उपलब्ध असल्यास त्यातून दुरुस्तीची कामे करण्यात येतील; मात्र निधीची कमतरता असल्यास पुढील डिसेंबरच्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.