स्‍वराज्‍यकर्ता ‘देवतुल्‍य’च !

संपादकीय

चिखली (वास्‍को) येथील ‘एस्.एफ्.एक्‍स्.’ चर्चचे पाद्री बोलमॅक्‍स पेरेरा यांनी चर्चमध्‍ये प्रार्थनेच्‍या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. ते म्‍हणाले, ‘‘हिंदूंना विचारा की, शिवाजी तुमचा देव आहे कि राष्‍ट्रपुरुष ? जर तो राष्‍ट्रपुरुष आहे, तर त्‍याला राष्‍ट्रपुरुषच राहू दे. त्‍याला देवाप्रमाणे वागवू नका.’’ या विधानामुळे त्‍यांच्‍या विरोधात ४ तक्रारी प्रविष्‍ट करण्‍यात आल्‍या आहेत, तसेच गुन्‍हा नोंदवण्‍याचीही मागणी करण्‍यात आली आहे. खरेतर या पाद्री महाशयांना असे बोलण्‍याचा अधिकार कुणी दिला ? एखादे व्‍यक्‍तीमत्त्व देव आहे कि नाही ? हे ठरवणारे पाद्री कोण ? क्रांतीकारक चे ग्‍वेरा यांना बोलिव्‍हिया येथे ‘देव’ मानले जाते. त्‍याविषयी पाद्री पेरेरा यांना ठाऊक आहे का ? ते याला विरोध करतील का ?

पाद्री बोलमॅक्‍स पेरेरा

गोव्‍यात ज्‍याने धर्माच्‍या गोंडस नावाखाली गोव्‍याच्‍या पूर्वजांवर अमानवी अत्‍याचार करून नरसंहार घडवला, अशा क्रूरकर्मा झेवियरला ‘गोंयचो सायब’ म्‍हटले जाते. त्‍यांला ‘संत’ म्‍हणून घोषित करणे कितपत योग्‍य आहे ? खरेतर अशा झेवियरला भक्षकच ठरवायला हवे. असे असतांना झेवियरला ‘गोंयचो सायब’ ठरवणे, हा उघड उघड राष्‍ट्रदोह आहे, तसेच गोवा मुक्‍तीसाठी पोर्तुगिजांविरुद्ध लढून सर्वस्‍वाचे बलीदान केलेल्‍या स्‍वातंत्र्यसैनिकांचा हा अवमान आहे. ‘कोकणची निर्मिती करणारा श्रीविष्‍णूचा ६ वा अवतार भगवान परशुराम हाच प्राचीन काळापासून गोव्‍याचा खरा रक्षणकर्ता आहे’, हे लक्षात घ्‍यायला हवे. ‘ज्‍याने रक्षण नव्‍हे, भक्षण केले, अशा झेवियरचे शव अजूनही चर्चमध्‍ये ठेवले जाते’, याविषयी बोलण्‍यासाठी पाद्री पेरेरा तोंड उघडतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे पेरेरा यांच्‍याकडे आहेत का ? या उदाहरणांना कधीही विरोध न करणार्‍या पाद्री पेरेरा यांनी हिंदूंना मात्र धर्मभावना शिकवण्‍याचा कदापि प्रयत्न करू नये. अन्‍य धर्मियांविषयी द्वेषमूलक वक्‍तव्‍ये करणार्‍या आणि धर्माधर्मांत फूट पाडण्‍याचा प्रयत्न करू पहाणार्‍या व्‍यक्‍तीला पाद्री म्‍हणून रहाण्‍याचा अधिकार आहे का ? ज्‍या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पेरेरा यांनी केली, त्‍यांच्‍या इतके तसूभरही कार्य कोणत्‍याही पाद्रयाने केलेले नसावे. त्‍यामुळे अशा वाचाळविरांंची योग्‍य शब्‍दांत केवळ कानउघाडणी नव्‍हे, तर त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई व्‍हायलाच हवी. याकडेही सरकारने लक्ष द्यावे.

पाद्री पेरेरा यांनी गोव्‍यात विधान केले; म्‍हणून तेथील शिवप्रेमींनी त्‍यांच्‍या पद्धतीने विरोध करत तक्रारी प्रविष्‍ट केल्‍या. आजपर्यंत छत्रपती शिवरायांचा अनादर झाल्‍यावर महाराष्‍ट्रातील शिवप्रेमी संघटित होतात; पण गोव्‍यातील हिंदू आणि शिवप्रेमी यांचेही यासाठी संघटन झाले, हे निश्‍चितच स्‍तुत्‍य आणि प्रेरणादायी आहे. गोव्‍यातील भाजपचे समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्‍यासह महाराष्‍ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनीही ‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देवच आहेत. तसेच अन्‍य आमदारांनीही पाद्री पेरेरा यांच्‍या विधानाला विरोध केला आहे. याविषयी पाद्री पेरेरा यांना काय म्‍हणायचे आहे ?

हिंदु धर्मात नाक खुपसू नये !

भारतातील प्रत्‍येक नागरिक आणि शिवप्रेमी यांच्‍या मनामनात छत्रपती शिवाजी महाराज हे वंदनीय आणि देवतुल्‍य म्‍हणूनच आदर्श आहेत. त्‍यामुळे त्‍या स्‍थानाला धक्‍का लावण्‍याचा किंवा ते स्‍थान हिरावून घेण्‍याचा प्रयत्न कुणी चुकूनही करू नये. ज्‍यांच्‍यामुळे आज आपण सुरक्षित आहोत, ज्‍यांनी धर्मांतराच्‍या अत्‍याचारांपासून आपल्‍याला वाचवले, ज्‍यांनी देशातील श्रद्धा टिकवून ठेवली, मंदिरांचा वारसा जतन केला, ज्‍यांनी कोणत्‍याही धर्माची विटंबना केली नाही, तसेच प्रत्‍येक स्‍त्रीला मातेसमान मानले, असे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्‍येकासाठी केवळ योद्धे, राष्‍ट्रपुरुष किंवा महापुरुष नाहीत, तर ते प्रत्‍येकाच्‍या मनमंदिरातील आराध्‍यदैवत म्‍हणजेच ‘देव’ आहेत. ‘जो आपले रक्षण करतो, तो ‘देव’च असतो. ‘या ‘देवा’मुळे (शिवरायांमुळे) आज आपण जिवंत असून या स्‍वराज्‍यात टिकून आहोत’, ही भावना प्रत्‍येकाच्‍या मनात आहे. अशा देवतुल्‍य योद्ध्याचे विडंबन करणे, हा पेरेरा यांनी केलेला उघड उघड राष्‍ट्र आणि धर्म द्रोहच होय. मोगल आणि पोर्तुगीज यांच्‍या जाचातून छत्रपती शिवरायांनीच हिंदूंना वाचवले होते, हे महान कार्य हिंदू विसरणार नाहीत. ५ पातशाह्यांचा पराभव करून, राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍याप्रती अभिमान निर्माण करून हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मानाचा मुजरा केला जातो, तर कधी त्‍यांना वंदन करतांना त्‍यांच्‍या दैवी राष्‍ट्रकार्याला अभिवादन म्‍हणून हात जोडले जातात. छत्रपती शिवरायांवरील श्रद्धा आणि आदर यांच्‍या स्‍थानाला कुणी जराही धक्‍का लावण्‍याचा प्रयत्न केला, तर शिवप्रेमी हे खपवून घेणार नाहीत. पेरेरा यांनी केवळ स्‍वधर्माच्‍या दृष्‍टीने आचरण आणि मार्गदर्शन करत रहावे. अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांच्‍या संदर्भात नाक खुपसण्‍याचा प्रयत्न करू नये.

तोंडदेखली उपरती !

हिंदु आणि शिवप्रेमी यांच्‍या प्रखर विरोधानंतर पाद्री पेरेरा यांनी स्‍वतःच्‍या वक्‍तव्‍याच्‍या प्रकरणी क्षमा तर मागितलीच नाही, केवळ वरवरची दिलगिरी व्‍यक्‍त केली आहे. एखाद्याच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍यावर क्षमा मागायची असते, इतके साधे सौजन्‍यही पेरेरा यांना कसे नाही ? याचे आश्‍चर्यच वाटते. ‘माझा हेतू शुद्ध होता’, असे म्‍हणून घडलेल्‍या प्रकरणावर पडदा पाडण्‍याचाच त्‍यांचा हेतू आहे. त्‍यांनी दिलगिरी व्‍यक्‍त केली; म्‍हणून त्‍यावरच संतुष्‍ट न होता शिवप्रेमींनी त्‍यांना अटक होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घेत रहायला हवा. जरी ही घटना गोव्‍यात घडलेली असली, तरी सर्वत्रच्‍या शिवप्रेमींनी पेरेरा यांच्‍या विरोधात आवाज उठवून त्‍यांना पळता भुई थोडी करावी. ज्‍या छत्रपती शिवरायांमुळे आपण आहोत, त्‍यांनी दिलेल्‍या शौर्याचे जागरण करण्‍याची वेळ आता आलेली आहे. हिंदूंनो, आता देशद्रोह खपवून घेऊ नका ! प्रजाहितदक्ष कल्‍याणकारी राजा असणार्‍या; परंतु हिंदु धर्मीय असल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात भूमिका घेऊन अन्‍य धर्मीय आक्रमणकर्त्‍यांची भलामण करणार्‍या पेरेरा यांना वैध मार्गाने त्‍यांची जागा दाखवा. छत्रपती शिवरायांप्रमाणे इतिहास घडवून ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार व्‍हा !

प्रजाहितदक्ष कल्‍याणकारी राजाचा द्वेष करून आक्रमणकर्त्‍यांची भलामण करणार्‍यांना त्‍यांची जागा दाखवून द्या !

सविस्तर वृत्त वाचा –

पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात ४ तक्रारी : कारवाईची मागणी
https://sanatanprabhat.org/marathi/707826.html