पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमधील प्रार्थनेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे विधान केल्याचे प्रकरण
पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – चिखली येथील ‘एस्.एफ्.एक्स्.’ चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी समस्त हिंदूंचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे आणि २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे विधान केले. या विधानाचे चलचित्र (व्हिडिओ) सध्या सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. यामध्ये पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदूंना विचारा ‘शिवाजी’ तुमचा देव आहे कि राष्ट्रपुरुष ? जर तो राष्ट्रपुरुष आहे, तर त्याला राष्ट्रीय पुरुषच राहू द्या आणि त्याला देवाप्रमाणे वागवू नका.’’
पेरेरा यांच्या या विधानामुळे गोव्यातील शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पाद्री पेरेरा यांच्या विरोधात ‘शिवजयंती समारोह समिती, काणकोण’ यांनी काणकोण पोलीस ठाण्यात, तर ‘हिंदवी स्वराज्य संघटना’ आणि ‘९६ कुळी क्षत्रिय मराठा समाज’ यांनी फोंडा आणि केपे येथील पोलीस ठाण्यांमध्ये मिळून ४ तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात २ धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी प्रथम दर्शनी अहवाल (एफ्.आय्.आर्.) नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य –
१. सामाजिक माध्यमांत फिरत असलेल्या चलचित्रात पाद्री पेरेरा असे म्हणत आहेत की, शेजार्यांना (हिंदूंना) वाईट वाटेल आणि ते आम्हाला दुखावणार; म्हणून तुम्ही (चर्चमध्ये प्रार्थना ऐकणारे ख्रिस्ती) बोलत नाही. आता आम्हाला शेजारच्या हिंदु माता-भगिनी यांच्याकडे संवाद साधण्यास प्रारंभ केला पाहिजे. त्यांना विचारले पाहिजे की, ‘शिवाजी’ तुमचा देव आहे कि राष्ट्रपुरुष ? जर तो राष्ट्रपुरुष आहे, तर त्याला राष्ट्रीय पुरुषच ठेवा आणि त्याला देवाप्रमाणे वागवू नका.
२. ‘शिवजयंती समारोह समिती, काणकोण’ यांच्या वतीने तक्रार नोंदवणारे श्री. सम्राट भगत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पेरेरा यांच्या विरोधात ‘एफ्.आय्.आर्.’ नोंदवावा. पाद्री पेरेरा यांनी असे विधान करण्यामागे हेतू काय आहे ? याचा शोध घ्यावा. पेरेरा यांनी आक्षेपार्ह विधान मागे घेऊन त्वरित सार्वजनिकरित्या क्षमा मागावी. पाद्री पेरेरा याच्यावर कारवाई करावी.’’
३. ‘पाद्री पेरेरा यांना गोव्यात मणीपूरसारखी स्थिती निर्माण करायची आहे’, असे अन्य एका तक्रारीत म्हटले आहे.
. . . नाहीतर परधार्जिणी प्रवृत्ती ठेचण्याची वेळ यायला विलंब लागणार नाही ! – प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर
छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा गोमंतकियांसाठी केवळ प्रेरणादायी राष्ट्रपुरुषच नव्हे, तर एक दैवत आहेत. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी यापूर्वी कळंगुट येथे शिवजयंती मिरवणुकीला आणि कळंगुट येथे सार्वजनिक चौकात शिवपुतळा उभारण्यास विरोध केला आहे. गोवामुक्तीच्या ६० व्या वर्षीच्या प्रजासत्ताकदिनी पोर्तुगिजांची भलावण करणारे पाद्री सुकुर मेंदीश एकदा सार्वजनिक प्रार्थनेत म्हणाले होते, ‘‘पोर्तुगीज गोव्यात प्रेम घेऊन आले आणि गोवेकरांचे प्रेम घेऊन गेले. पोर्तुगिजांनी आम्हाला संस्कृती दिली आणि उत्तम नागरिक बनवले. पोर्तुगिजांनी आम्हाला प्रेमाने सांभाळले.’’ राचोल सेमिनरीचे रेक्टर फादर व्हिक्टर फेर्राव यांनी ‘पोर्तुगीज गोव्यात आले, तेव्हा येथे हिंदु नव्हते आणि पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे हिंदूंची नव्हती’, असे उघडपणे म्हटले.
आजपर्यंत हिंदूंनी अशा तर्हेच्या विधानांना कोणताही प्रतिकार न करता सहन केले आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावावर येथे देशद्रोह खपवला जात आहे. उघडपणे चाललेले अराष्ट्रीयीकरण पचवले जात आहे. खोटा इतिहास आणि पोर्तुगिजांची चमचेगिरी सहन केली जात आहे. सहनशीलतेलाही अंत असतो, याचे भान या विकृतांनी ठेवावे, नाहीतर ही परधार्जिणी प्रवृत्ती ठेचण्याची वेळ यायला विलंब लागणार नाही, हे सत्य !