(‘डेटिंग’ म्हणजे आवडीच्या व्यक्तीला जवळून जाणून घेण्यासाठी तिच्यासमवेत वेळ घालवणे)
कोलकाता (बंगाल) – बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ सेवा पुरवण्याच्या नावाखाली बनावट ‘कॉल सेंटर’ चालवणार्यांना १६ जणांना अटक केली आहे. यात १० तरुणी आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. महिलांना न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे, तर पुरुषांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून जादवपूर विभागातील पोद्दारनगरातील एका इमारतीतील सदनिकेत धाड घातली. येथून ४ तरुणी आणि १ तरुण यांना अटक करण्यात आली. हे आरोपी भ्रमणभाषद्वारे ‘डेटिंग’ संकेतस्थळांचे कर्मचारी असल्याचे सांगत लोकांना संदेश पाठवत होते. संदेशाला कुणाकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांना संकेतस्थळवर नोंदणी करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळत होते. आरोपी संबंधितांना विविध संकेतस्थळांवरील तरुणींची छायाचित्रे पाठवत होते. यातून ते दावा करत होते की, त्यांनी यांपैकी निवडलेल्या तरुणी त्यांचे मनोरंजन करतील. त्यानंतर ते संबंधितांकडून गोपनीयता शुल्क, उपाहारगृहात रहाण्याची नोंदणी आदींच्या नावाखाली त्यांच्याकडून ५ ते १५ सहस्र रुपये उकळत होते. पैसे मिळाल्यावर मात्र आरोपी संबंधितांना कोणतीही सेवा देत नव्हते.