चारा छावणी चालकांची थकित देयके देण्याचा प्रयत्न करू ! – राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल, पशूसंवर्धनमंत्री

विधान परिषद लक्षवेधी सूचना !

श्री. राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल, पशूसंवर्धनमंत्री

मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – चारा छावण्यांसंदर्भात अनियमितता, अपव्यवहार, तसेच त्रुटी आढळल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी समिती नेमली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील तांत्रिक गोष्टी पडताळून ज्या चारा छावणींची देयके थकबाकी असेल, ते देण्याचा प्रयत्न करू, असे महसूल, पशूसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि माळशिरस तालुक्यांतील चारा छावणी देयके अदा करण्याविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

शेकापचे आमदार श्री. जयंत पाटील

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘‘चारा छावण्यांसाठी वर्ष २०१९-२० मध्ये ९७५ कोटी रुपये, तर २०२०-२१ मध्ये ११६ कोटी रुपये वितरीत केले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १४६ चारा छावणी होत्या. सांगोला तालुक्यात १०९ कोटी रुपये, तर मंगळवेढा तालुक्यात ३३ कोटी रुपये चारा छावणी चालकांना दिले आहेत. सांगोला येथील २१ कोटी ४७ लाख १४ सहस्र ९२२ रुपये, तर मंगळवेढा येथील १२ कोटी २० लाख ९६ सहस्र १५२ रुपये, तसेच माण आणि खटाव तालुक्यांतील चारा छावणी चालकांची देयके यातील तांत्रिक गोष्टी पडताळून घेऊ. आलेल्या अहवालातील शिफारशींची मुख्य सचिवांशी चर्चा करून त्या संदर्भात लगेच बैठक घेतली जाईल.’’