मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. या वेळी विरोधकांतील काहींनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांना फासावर चढवण्याची मागणी केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारने याविषयी पडताळून योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांच्या निर्देशानुसार पडताळून कार्यवाही केली जाईल, असे सभागृहात सांगितले.
सौजन्य एबीपी माझा
या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘संभाजी भिडे’ नावाच्या गृहस्थाने अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी निंदाजनक वक्तव्य केले. ही व्यक्ती समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. राष्ट्रपित्याविषयी निंदाजनक वक्तव्य करणारी व्यक्ती बाहेर कशी फिरू शकते ? या व्यक्तीला त्वरित अटक करा’, अशी मागणी सभागृहात केली.
या वेळी सर्व विरोधकांनी जागेवर उभे राहून पू. भिडेगुरुजी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘या प्रकरणी खात्री करूनच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल’, असे सांगितले.