कपाळावर त्रिपुंड लावल्याने विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढले!

  • मेरठ (उत्तरप्रदेश) येथील महाविद्यालयातील घटना

  • हिंदु विद्यार्थ्यांना अत्याचारांविषयी जागृत करत असल्याच्या रागातून महाविद्यालयातून काढल्याचा विद्यार्थिनीचा दावा !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे कपाळावर त्रिपुंड (त्रिपुंड म्हणजे कपाळावर चंदन किंवा भस्म यांद्वारे ३ बोटांनी आडव्या काढलेल्या रेषा. यात २७ देवतांचा वास असतो.) काढल्याने आणि हातात रुद्राक्षाची माळा घेतल्याने सुभाष इंटर महाविद्यालयातून काढण्यात आल्याचा आरोप एका विद्यार्थिनीला केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाचा दावा आहे की, या विद्यार्थिनीला  लहान त्रिपुंड लावण्यास सांगण्यात आले होते; मात्र तिने नकार दिला.

१. विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, प्राचार्यांनी सांगितल्यानंतर लहान त्रिपुंड लावून महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतरही ते ओरडले आणि मला शाळेतून काढून टाकले. मी वर्गातील विद्यार्थ्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरल स्टोरी’ सारख्या चित्रपटांविषयी माहिती देऊन त्यांच्यात जागृती करत होते. यामुळेच मला काढून टाकण्यात आले.
मी श्रावण मासातच त्रिपुंड लावून शाळेत जात होते.

२. या विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, शिक्षकांनी पालकांना बोलावल्यानंतर मी महाविद्यालयात गेले. त्रिपुंड लावणे हा हिंदु परंपरांचा भाग असल्याचे सांगितल्यानंतरही प्राचार्यांनी ऐकून घेतले नाही आणि महाविद्यालयातून जाण्यास सांगितले.

३. याविषयी प्राचार्य भावना चौहान यांनी सांगितले की, विद्यार्थिनीला त्रिपुंड लावल्याने काढण्यात आलेले नाही. ती पूर्ण कपाळावर टिळा लावून येत होती. त्यामुळे तिला तो लहान लावण्यास सांगण्यात आले; मात्र त्यास तिने नकार दिला. तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. पालकांनाही ते सांगण्यात आले. जर एक विद्यार्थिनी असे करू लागली, तर अन्य धर्मांचे विद्यार्थीही त्यांच्या धर्मानुसार वागण्याची मागणी करतील. यामुळे शाळेचे वातावरण बिघडू शकते.

४. विभागीय संयुक्त शिक्षण संचालक ओंकार शुक्ला यांनी म्हटले की, धार्मिक भावनांवरून कुणाला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. जर त्रिपुंड लावल्याने शाळेत येण्यास रोखण्यात आले असेल, तर ते योग्य नाही. या प्रकरणी चौकशी केली जात आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

आधीच हिंदु विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कपाळावर टिळा, कुंकू लावत नाहीत आणि जर शाळा-महाविद्यालये येथे कुणी टिळा लावला, तर त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर हिंदु धर्मातील परंपरा जाणीवपूर्वक नष्ट करण्याचेच हे षड्यंत्र आहे, असेच म्हणावे लागेल !