सीमा हैदर ही भारत-नेपाळ मैत्री बस सेवेचा अपलाभ घेऊन चतुराईने आली भारतात !

नेपाळच्या उच्चपदस्थ अधिकार्‍याचा दावा

पाकिस्तानी महिला सीमा हैदर

देहली – भारत-नेपाळ मैत्री बससेवा ही केवळ भारत आणि नेपाळ येथील नागरिकांसाठी चालू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ भारत आणि नेपाळ वगळता तिसर्‍या कोणत्याही देशाचा नागरिक घेऊ शकत नाही. असे असले, तरी पाकची नागरिक सीमा हैदर याच बसने भारतात आली, असा दावा नेपाळच्या पोखरास्थित भारत-नेपाळ मैत्री बसचे उच्चपदस्थ अधिकारी टिकाराम अधिकारी यांनी केला. या वेळी त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केली.

टिकाराम अधिकारी पुढे म्हणाले की, सीमा गुलाम हैदर ही महिला चतूर आहे. तिला ठाऊक होते की, पाकिस्तानमधून थेट भारतात जाणे अशक्य आहे. त्यामुळे तिने या मार्गाचा अवलंब केला. नेपाळहून भारतात जाण्यासाठी आणखीही काही लोकांनी तिला साहाय्य केलेले असू शकते. त्या लोकांना नेपाळमधून भारतात येणार्‍या सर्व रस्त्यांची माहिती होती. सीमेवर सर्व प्रवाशांची कसून तपासणी होते; मात्र येथेही तिने खोटी माहिती दिली असावी, असा दावाही टिकाराम यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

प्रकरणातील संवेदनशीलता पहाता सीमा हैदर हिला अवैधपणे भारतात पोचवणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी भारतीय यंत्रणांनी कंबर कसणे आवश्यक !