उद्या कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

रत्नागिरी, २३ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील खेड ते आरवली रोड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २५ जुलै या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १ ते ४ या कालावधीत मेगाब्लॉक (अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावर धावणार्‍या ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

यामध्ये गाडी क्र. ०२१९७ कोइम्बतूर-जबलपूर ही विशेष गाडी २४ जुलै या दिवशी मडगाव (गोवा) ते संगमेश्वर रोड या स्थानकांच्या दरम्यान २.३० घंटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे. १०१०६ सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस ही गाडी २५ जुलै या दिवशी सावंतवाडी ते संगमेश्वर रोड या स्थानकांच्या दरम्यान २ घंटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे आणि १०१०४ मडगाव-मुंबई ही मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी ते संगमेश्वर रोड या स्थानकांच्या दरम्यान १ घंटा नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे. या ‘मेगाब्लॉक’मुळे गाड्यांच्या वेळांत होणार्‍या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी. ‘प्रवाशांच्या झालेल्या असुविधेविषयी आम्ही दिलगीर आहोत’, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.