परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची भावपूर्ण पूजा केल्याने यवतमाळ येथील श्री. मिलींद सराफ (वय ६० वर्षे) यांना त्यात जाणवलेले पालट !

श्री. मिलींद सराफ

१. एका साधकाच्या भ्रमणभाषमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वेगळे असे छायाचित्र पाहून त्या छायाचित्राकडे आकर्षिले जाणे

‘दोन वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मीदेवीच्या पूजनाचा महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही एका साधकाच्या घरी गेलो होतो. तेथे दुसर्‍या एका साधकाच्या भ्रमणभाषमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वेगळे असे छायाचित्र पहायला मिळाले. ते छायाचित्र पाहिल्यानंतर मी त्याच्याकडे आकर्षिला गेलो आणि मी माझ्या भ्रमणभाषमध्ये ते छायाचित्र घेतले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकित प्रतीकडे पाहून मी नामजप करणे

नेहमी दर्शन व्हावे, यासाठी मी काही दिवस ते छायाचित्र भ्रमणभाषच्या ‘स्क्रीन’वर ठेवले. एकदा मनात असा विचार आला की, हे छायाचित्र प्रत्यक्ष मिळेल का ? याची चौकशी करावी; पण त्याऐवजी याच छायाचित्राची मी छायाचित्रांकित प्रत (प्रिंट) काढली आणि प्लास्टिकच्या पाकिटात घालून ठेवली. या छायाचित्रांकितप्रतीकडे पाहून मी नामजप करत असे.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात झालेला पालट पाहून त्या छायाचित्राची ‘फ्रेम’ करून त्याची पूजा करणे

काही दिवसांनी छायाचित्रांकित प्रतीतील परात्पर गुरूंच्या हनुवटीजवळ लालसर छटा दिसली. तेव्हा मला प्रत्येक वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे मारुति आहेत’, असा भास होत असे. प्रतिदिन तो पहात असल्याने नंतर पूर्ण हनुवटी आणि मुखाजवळचा अन् नाकापर्यंतचा रंग गडद लाल होत असल्याचे लक्षात आले. हा आश्चर्यकारक पालट पाहून मी तीच छायाचित्रांकित प्रत ‘फ्रेम’मध्ये ठेवली. देवाची पूजा झाल्यावर मी प्रतिदिन या छायाचित्राचीही पूजा करू लागलो. नंतरच्या काळात मी त्या छायाचित्राकडे पाहून आत्मनिवेदन करू लागलो. हळूहळू छायाचित्राच्या चारही कोपर्‍यांचा रंगही लालसर होत गेला. त्यानंतर काही दिवसांनी ओठ, नाक आणि डोळ्यापर्यंतचाही रंग लालसर होत गेल्याचे लक्षात आले. दुसरीकडे कोपर्‍यातील लाली आता कपाळावरही दिसू लागली.

४. छायाचित्रावरील श्रद्धा पुष्कळ वाढणे आणि घर चैतन्यमय होणे

माझी या छायाचित्रावरील श्रद्धा पुष्कळ वाढली. ‘त्या छायाचित्रातून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रक्षेपित होत आहे. घरामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व असल्याने घर चैतन्यमय झाले आहे’, असे जाणवू लागले.

५. आम्ही रहातो ते घर आमचे नसून ‘गुरूंचा आश्रम आहे’, असेच जाणवायला लागले आहे.’

– श्री. मिलींद सराफ (वय ६० वर्षे), यवतमाळ (२१.४.२०२२)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रापुढे उदबत्ती लावून श्लोक म्हटल्यावर आलेली अनुभूती ! 

सौ. मधुरा सराफ

‘मी प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांच्या या छायाचित्राजवळ उदबत्ती लावते आणि तेथेच उभे राहून श्लोक म्हणते. छायाचित्राकडे केव्हाही पाहिले की, माझा नामजप चालू होतो. रात्री झोपतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करते. तेव्हा परात्पर गुरु डाॅक्टर घरात फिरतांना दिसतात. त्यामुळे मला कशाचीही भीती वाटत नाही.

परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा उभयतांना ही अनुभूती दिली, त्याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– सौ. मधुरा मिलींद सराफ (वय ५५ वर्षे), यवतमाळ, (२१.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक