राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या व्याघ्र प्रकल्प निकषात गोवा बसत नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

व्याघ्र प्रकल्पाची मागणी गोवा सरकारने फेटाळली

एन्.टी.सी.ए.’च्या व्याघ्र प्रकल्पाच्या निकषात गोवा राज्य बसत नाही. त्यामुळे गोव्यात व्याघ्र प्रकल्प नाही !

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एन्.टी.सी.ए.) म्हादई अभयारण्यासह काही परिसर व्याघ्र क्षेत्र करण्याचा प्रस्ताव गोवा सरकारकडे ठेवला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्राधिकरणाचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. या निर्णयाविषयीची माहिती गोवा सरकार लवकरच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला देणार आहे.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘एन्.टी.सी.ए.’च्या व्याघ्र प्रकल्पाच्या निकषात गोवा राज्य बसत नाही. त्यामुळे गोव्यात व्याघ्र प्रकल्प करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळेच हा प्रस्ताव वन्यजीव मंडळाच्या बैठकीत फेटाळण्यात आला.’’ वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘आधीच सत्तरी तालुक्यातील लोकांना विविध कारणांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या जीवनाशी खेळून कुठलीच गोष्ट करता येणार नाही. व्याघ्र प्रकल्प करणे गोव्याला परवडणारे नाही.’’

‘व्याघ्र प्रकल्प’ घोषित झाल्यासच ‘म्हादई’चे रक्षण ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

श्री. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादईच्या रक्षणासाठी अभयारण्यातील काही भाग ‘व्याघ्र प्रकल्प’ घोषित केल्यास निश्चितपणे म्हादईचे रक्षण होईल.

 (सौजन्य : News Matters)

अभयारण्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे. व्याघ्र प्रकल्प झाल्यास कर्नाटकच्या म्हादईचे पाणी वळवण्याच्या कृतीवर निर्बंध येईल. त्यामुळेच म्हादईचे रक्षण होईल, असे मत पर्यावरण अभ्यास राजेंद्र केरकर यांनी यापूर्वी व्यक्त केले आहे.