India Bangladesh Border Tension : दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांना समन्स बजावून जाब विचारला !

भारत-बांगलादेश सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कथित बांधकामाचे प्रकरण  

(समन्स म्हणजे न्यायालय किंवा सरकार यांच्याकडून संबंधितांना माहिती देण्यासाठी बोलावणे)

भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा

नवी देहली – बांगलादेशाने तेथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावून त्यांना जाब विचारल्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशाचे उप उच्चायुक्त नरूल इस्लाम यांना समन्स बजावून त्यांना जाब विचारला. भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या कथित हालचालींबद्दल बांगलादेशाने चिंता व्यक्त केली होती.

१. बांगलादेशाने म्हटले आहे की, भारत हा सीमेवर ५ ठिकाणी सुरक्षा कुंपण करण्याचे प्रयत्न करत आहे. हे उभय देशांत झालेल्या कराराचे उल्लंघन आहे.

२. बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयातील भेटीनंतर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी सांगितले की, या बैठकीत तस्करी, तसेच गुन्हेगारी कृत्ये या सूत्रांवर चर्चा झाली. गुन्हेगारीमुक्त सीमारेषा करण्याच्या दिशेने चर्चा झाली.

३. भारत-बांगलादेश सीमेवरील चपैनवाबगंज, नौगाव, लालमोनिरहाट आणि ३ बिघा कॉरिडोर येथे सीमा सुरक्षा दलाच्या कामावर बांगलादेशाने आक्षेप घेतला आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाकडून अशा प्रकारचे कृत्य करणे, हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न आहे. भारताने याला गांभीर्याने घेतले नाही, तर तो डोक्यावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच बांगलादेशाला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘बांगलादेश स्वतःच्या सीमेवर कुणालाही जागा देणार नाही !’

लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जहांगीर आलम चौधरी

काही दिवसांपूर्वी बांगलादेशाच्या गृह मंत्रालयाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर गृह मंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांनी ‘बांगलादेश स्वतःच्या सीमेवर कुणालाही जागा देणार नाही. भारत-बांगलादेश सीमेवर शून्य रेषेच्या १५० फूटांच्या आत कोणतेही सैनिकी बांधकाम करण्यास अनुमती दिली जाणार नाही, असे म्हटले होते.

बांगलादेशाच्या विरोधामुळे भारताला ३ जिल्ह्यांतील ५ ठिकाणी सीमेवर काम थांबवावे लागले आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या उपकारामुळे निर्माण झालेला देश आज भारताला डोळे वटारून दाखवतो, याला भारताचे अपयश म्हणायचे का ? ही स्थिती पालटण्यासाठी भारताने कठोर होण्याची वेळ आली आहे !