
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल मदनपुरा भागात बंद असलेल्या २०० वर्षे जुन्या सिद्धेश्वर मंदिराचे कुलूप जिल्हा प्रशासनाने उघडले आहे. त्यात अनेक शिवलिंगे सापडली आहेत. येत्या १५ जानेवारीनंतर या मंदिरात पूजेला प्रारंभ होणार आहे.
१. मदनपुरा परिसर मुसलमानबहुल भाग असल्यामुळे काही हिंदु संघटनांनी मंदिर त्वरित उघडण्याची मागणी केली होती. यावर प्रशासनाने मंदिराची पाहणी केली आणि मंदिराचे कुलूप उघडले. हे मंदिर २०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. पुरातत्व विभागानेही हे मंदिर मध्ययुगीन काळातील मानले आहे.
२. बनारस हिंदु विश्वविद्यालयातील पुरातत्व विभागाचे प्राध्यापक अशोक सिंह म्हणाले, ‘‘हे मंदिर पाहिल्यावर ते पुष्कळ जुने आहे आणि मध्ययुगीन भारतातील आहे, हे लक्षात येते. हे नागर शैलीचे मंदिर आहे. येथील मुख्य शिवलिंग गायब आहे; परंतु तिथे असलेल्या अनेक शिवलिंगांपैकी एक शिवलिंग जुने आहे जे मध्ययुगीन काळातील असल्याचे दिसून येते. जेव्हा हे मंदिर जनतेसाठी उघडेल, तेव्हा आम्ही ते पाहण्यासाठी जाऊ आणि त्यानंतर आमचे पथक मंदिराचे सर्वेक्षण करील. आम्ही हे मंदिर किती जुने आहे याचा अभ्यास करू.’’