Nigeria Air Strike By Mistake : नायजेरियात हवाईदलाने चुकून स्थानिक लोकांवर केलेल्या आक्रमणात १६ जण ठार !

प्रतिकात्मक छायाचित्र

अबुजा – आफ्रिकी देश नायजेरियाच्या झम्फारा राज्यामध्ये नुकतेच सैन्यदलाने केलेल्या हवाई आक्रमणात १६ जण ठार झाले. याविषयीच्या एका वृत्तानुसार सैन्यदलाच्या वैमानिकाने चुकून स्थानिक लोकांच्या संरक्षणदलाला गुन्हेगारी टोळी समजून हे आक्रमण केले. नायजेरियाचे सैन्यदल अनेक दिवसांपासून या भागात गुन्हेगारी टोळ्यांशी लढत आहे.

१. येथील गुन्हेगारांच्या टोळ्या गावांवर आक्रमणे करतात, खंडणीसाठी लोकांचे अपहरण करतात आणि त्यांची घरे जाळतात. त्यामुळे तेथे रहाणार्‍या सर्वसामान्य नागरिकांनी संरक्षणदल सिद्ध केले असून ते स्वसंरक्षणार्थ बंदुका घेऊन गुन्हेगारांना हाकलून लावते.

२. नुकतेच झम्फारा राज्यातील डांगेबे गावात गुन्हेगारी टोळ्यांनी (दरोडेखोरांनी) आक्रमण करून अनेक जनावरे लुटली. यानंतर गावकर्‍यांच्या सुरक्षादलाने त्यांच्यावर बंदुकींनी आक्रमण केले आणि त्यांना हाकलून देऊन परतत असतांना तुंगारकारा गावाजवळ लढाऊ विमानाने त्यांच्यावर गोळीबार केला.

३. नायजेरियात सर्वसामान्यांवर असे हवाई आक्रमण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वर्ष २०२३ मध्ये नायजेरियन सैन्याने उत्तर-पश्‍चिम कादुना राज्यात एका धार्मिक मेळाव्यावर चुकून गोळीबार केला होता, ज्यात ८५ लोक ठार झाले होते. यासह वर्ष २०१७ मध्ये निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या हवाई आक्रमणात ११२ जणांचा मृत्यू झाला होता.